जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पीएम मोदी, मुख्यमंत्र्यांचे आभार; विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते: पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधवांचा विश्वास
Smita Jadhav: भाजप प्रवेशानंतर डॉ. स्मिता जाधव यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते.

Smita Jadhav Joins BJP: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील एक अत्यंत अभ्यासू व प्रभावी चेहरा म्हणून डॉ. स्मिता जाधव आणि स्वामी विवेकानंद मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी भाजपत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. पुणे पदवीधरमधून डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर पुणे शिक्षकमधून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षप्रेवशावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, पक्षात उमेदवारी घोषित झाल्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, तेव्हा पक्षासोबत राहणे ही पक्षाची शिस्त आहे. शरद लाड यांनी या निवडणुकीसाठी तयारी केली होती मी त्याचा साक्षीदार आहे. या 15 दिवसात प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे अवघड आहे. दोन्ही उमेदवार आमचे होतकरू आहेत. पहिल्या पसंतीचे मतदान मिळवण्यासाठी अधिक प्रयन्त करावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते
भाजप प्रवेशानंतर डॉ. स्मिता जाधव यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते. त्यांनी सांगितले की, जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश दिल्याबद्दल मी पीएम मोदी, मुख्यमंत्री यांचे आभार मानते. विकासाच्या गंगेत आपले योगदान असावे म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी नमूद केले. त्या पुढे म्हणाल्या, मला काम करण्याची संधी मिळेल. कोल्हापूर माझी जन्मभूमी आणि पूणे कर्मभूमी आहे. पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मला दिल्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे.
दोन्ही मतदारसंघ आम्ही खेचून आणू
पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या कौस्तुभ गावडे यांनी सांगितले की,नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामातून प्रेरणा घेऊन मी सहा वर्षांपासून भाजपमध्ये काम करत आहे. पदवीधर आणि शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ आम्ही खेचून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, मी पाच जिल्हे पिंजून काढले आहेत. माझ्यावर जबाबदारी टाकल्याबद्दल मी नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, रवींद्र चव्हाण यांचे आभार मानतो.
इतर महत्वाच्या बातम्या




















