Shivsena BJP Dharashiv ZP Election 2026: नगरपरिषद निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही धाराशिव जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रचंड गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या उमेदवारांचे एबी फॉर्म थेट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (ranajagjitsinha patil) व त्यांचे पुत्र मल्हार पाटील (Malhar Patil) यांच्या हातून वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या आरोपांना दुजोरा देणारी शिवसेना पदाधिकारी अविनाश खापे आणि जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी (Rajan Salvi) यांच्यातील ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा संताप स्पष्टपणे ऐकू येत असून, “शिवसैनिक म्हणून ओळख सांगायला लाज वाटते”, “दिवसभर आमच्यासोबत बैठका आणि रात्री भाजप आमदारांसोबत गुप्त बैठकांनंतर एबी फॉर्म वाटप”, असे थेट आरोप संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यावर करण्यात आले आहेत.
Shivsena BJP Dharashiv ZP Election 2026: तिकीट वाटप भाजप आमदारांकडे
ऑडिओ क्लिपमध्ये अविनाश खापे यांनी थेट जाब विचारताना सांगितले आहे की, शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मुलाच्या हातात कसे गेले? शिवसेनेचे उमेदवार उभे करण्याचा अधिकार भाजप नेत्यांना कोणी दिला? संपर्कप्रमुख म्हणून सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी तुमची असताना पक्षाची लोकशाही संपवून हुकूमशाही कशी सुरू केली, असा सवालही त्यांनी केला आहे. या संवादात राजन साळवी यांनी तिकीट भाजप आमदारांकडे दिल्याची कबुली दिल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. याआधीही धाराशिव जिल्ह्यात तिकीट वाटपात भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेचे तिकीट ‘विकल्याचा’ आरोप शिवसैनिकांनी केला होता.
Shivsena BJP Dharashiv ZP Election 2026: कार्यकर्त्यांचा संताप, डोळ्यात पाणी
या संपूर्ण प्रकरणामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. “आम्ही जीव धोक्यात घालून पक्षासाठी काम केलं, लोक अंगावर येत होते, गद्दार म्हणून हिणवलं गेलं, तरीही आम्ही शिवसेनेसाठी रस्त्यावर उतरलो. आज मात्र पक्षात लोकशाही राहिली नाही,” असा भावनिक उद्रेक कार्यकर्त्यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये व्यक्त केला आहे.
Shivsena BJP Dharashiv ZP Election 2026: ‘राणा पाटलांनी आमचा गेम केला’ जाहीर करा
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे की, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेनेचा ‘गेम’ केला असल्याचं पक्षाने जाहीर करावं आणि अपक्ष पुरस्कृत आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा राजकारण सोडून शिवसैनिक घरी बसतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
Shivsena BJP Dharashiv ZP Election 2026: धाराशिवमध्ये शिवसेनेला वाचवायचं असेल तर...
या ऑडिओ क्लिपमध्ये अविनाश खापे यांनी आपण तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते नसल्याचं स्पष्ट करताना, “मी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे. मात्र धाराशिवमध्ये शिवसेनेला वाचवायचं असेल तर तानाजी सावंत यांच्या हातात सूत्रं दिली पाहिजेत,” असं ठाम मत व्यक्त केलं आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
