मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) ऐतिहासिक विजय मिळवला. तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) लाजीरवाणा पराभव झाला. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) नेत्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची विनंती पदाधिकार्‍यांनी ठाकरेंकडे केली आहे. यामुळे विधानसभेच्या पराभवानंतर ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 95 जागांपैकी केवळ 20 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. ठाकरे गटाने माहीम, वरळी आणि वांद्रे पूर्व येथील प्रतिष्ठेच्या जागा जिंकल्या असल्या तरी स्ट्राइक रेट आणि जिंकलेल्या जागांची संख्या कमी झाल्याने ठाकरे गटाकडून विचारमंथन सुरु आहे. 


आता सपा-काँग्रेसची गरजच काय?


आता विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व 227 जागा लढवण्याची आपली ताकद असून महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि समाजवादी पक्षाशी युती करण्याऐवजी आपणच मुस्लिम उमेदवारांना तिकीट देऊ शकतो, अशी भूमिका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता ठाकरे गट महाविकास आघाडीतूनच पुढील निवडणुका लढणार की 'एकला चलो रे'ची भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


काय म्हणाले संजय राऊत?


दरम्यान, ठाकरे गट महाविकास आघाडीपासून वेगळा होणार? यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आत्ताच निकाल लागलेला आहे. निकालासंदर्भात सगळ्याच पक्षांचे चिंतन, मंथन, अभ्यास सुरू आहे. काही कार्यकर्त्यांची भूमिका असते, निवडणुकीत पराभव झाल्यावर त्यांना वाटतं की, आपण स्वतंत्रपणे लढायला हवं होतं. पण, आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. राज्यातल्या 14 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्या संदर्भातला एक निर्णय घ्यावा लागतो. राजकारणात इतक्या घाईने निर्णय घ्यायचे नसतात.  स्वतंत्रपणे लढण्याच्या भूमिका त्या त्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना असतात, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Solapur News: निवडणूक संपताच मविआच्या नेत्यांवर गंडांतर! बँकेतील कोटींच्या नुकसानीची होणार वसुली, या दिग्गज नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता