मुंबई: देशात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होण्याआधीच टीव्ही वाहिन्यांनी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर केले व तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाची शपथ घेतील हेसुद्धा सांगून टाकले. उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगालसारख्या मोठ्या राज्यांच्या मतदानासंदर्भात संपूर्ण 'डाटा' बाहेर आलेला नाही. राज्यांतील मतदानाची सारासार माहिती न घेता 'एक्झिट पोल'वाल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी बिनधास्त ठोकून दिले की, पुन्हा एकदा मोदीच येत आहेत व भाजपला आणि त्यांच्या आघाडीस (NDA) 350 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत. पण भाजप (BJP) 225 जागांच्या पुढे जात नाही व इंडिया आघाडी 295 ते 310 जागा जिंकून सरकार स्थापन करेल. त्यामुळे हा एक्झिट पोल (Exit Poll 2024) म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा आहे. त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही. मोदी जात आहेत हाच 4 जूनचा निकाल खरा आहे, असे भाष्य ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून करण्यात आले आहे.
देशात 1 जून रोजी लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर अनेक माध्यम संस्थांनी एक्झिट पोल्स जाहीर केले होते. बहुतांश एक्झिट पोल्समध्ये भाजपप्रणित एनडीए आघाडीला 350 च्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एक्झिट पोल्सच्या या आकडेवारीवर 'सामना'तून सडकून टीका करण्यात आली आहे. भाजपला 350 जागा मिळाव्यात असे कोणते महान कर्तृत्व या लोकांनी गाजवले आहे? 2014 आणि 2019 पेक्षा मोदींना लोक भरभरून मते देत आहेत व मोदी तिसऱ्यांदा विजयी होत असल्याचे चित्र निर्माण करणे हा फक्त पैशांचा कॉर्पोरेट खेळ आहे. मोदी ध्यानाला बसले तसा आपला निवडणूक आयोगही डोळे मिटून बगळयाप्रमाणे ध्यानाला बसला आहे. अर्थात, लोकशाहीत जनता सर्वोपरी व मतदार हाच राजा आहे. 4 जूनला मतमोजणी होईल व हुकूमशाहीचा अंधकार दूर होईल. मोदींनी ध्यान केले व सूर्याला शांत केले असे भाजपवाले सांगतात. मोदी यांनी ध्यान केले तरी जनतेच्या मनात उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाहीत व त्यामुळे भाजपचा पराभव होणारच आहे, असा दावा 'सामना'तून करण्यात आला आहे.
एक्झिट पोल्सच्या आकडेवारीवर शंका
ठाकरे गटाने एक्झिट पोल्सने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीबाबत शंका व्यक्त केली आहे. 1 तारखेस प. बंगाल, उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या. प. बंगालातील 10 जागांसाठी साधारण 59.15 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोग चार-पाच दिवसांनी या आकड्यात आणखी पाच-दहा टक्क्यांची भर टाकेल. मग एक्झिट पोलवाल्यांनी प. बंगालमधील निकाल कोणत्या आधारावर लावले?, असा सवाल 'सामना'तून उपस्थित करण्यात आला आहे.
हरयाणात एकूण 10 लोकसभेच्या जागा आहेत. 10 लोकसभा जागा असताना तेथे भाजपप्रणीत एनडीएला 16 ते 19 जागा मिळतील असे 'झी न्यूज'च्या एक्झिट पोलमध्ये दाखवले. हिमाचल प्रदेशात फक्त चार जागा असताना या राज्यात एनडीए सहा ते आठ जागा जिंकेल असा निकाल दिला आहे. बिहारमध्येदेखील लोक जनशक्ती पार्टी प्रत्यक्षात पाच जागांवर लढलेली असताना एक्झिट पोलमध्ये तो पक्ष सहा जागा जिंकू शकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
झारखंडमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकच जागा लढवत असताना त्या पक्षाला तीन ठिकाणी विजय मिळेल, असा 'चमत्कार' एक्झिट पोलवाल्यांनी केला आहे. हा सर्व आकड्यांचा बनावट खेळ आहे. देशातल्या जनतेचा मूड आणि हे एक्झिट पोल अजिबात मेळ खात नाहीत. ज्या प्रकारचे आकडे समोर आणले तो सर्व सरकारी दबाव तंत्र व भाजपने फेकलेल्या पैशांचा खेळ आहे, पण पैशांच्या हव्यासापायी या 'पोल' कंपन्यांनी स्वतःचीच बेअब्रू करून घेतली. काँग्रेसने तामीळनाडूत फक्त 9 जागांवर निवडणुका लढवल्या, पण 'आज तक'च्या एक्झिट पोलने तामीळनाडूत काँग्रेसला 13-15 जागा मिळतील अशी भविष्यवाणी केली. हे सर्व आकडे पाहिले तर एक्झिट पोलवाल्यांनी भाजपला 350 या जागा कमीच दिल्या. लोकसभा 543 जागांची असली तरी भाजपला साधारण 800 ते 900 जागा मिळायला काहीच हरकत नव्हती, अशी खोचक टिप्पणी 'सामना'तून करण्यात आली आहे.
आणखी वाचा