Girish Mahajan: नाशिक महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या (NMC Mayor Election 2026) पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि महायुतीतील (Mahayuti) मित्रपक्षांमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी “भाजपला कुबड्यांची गरज नाही” असे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटातील शिवसेना नेते संतप्त झाले असून, या प्रकरणावरून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.
नाशिक महापालिकेत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली असून, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. महापालिकेत सत्तास्थापनेसाठी समन्वय साधण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, या प्रस्तावावर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत “भाजपला कुबड्यांची गरज नाही” असा इशारा दिला.
Ajay Boraste: भाजपमध्येच समन्वयाचा अभाव
या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. “भाजपकडूनच सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव आला होता. आता तेच नाही म्हणत आहेत. भाजपमध्येच समन्वयाचा अभाव आहे,” असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
Ajay Boraste: भाजपचं वागणं अनाकलनीय
एबीपी माझाशी बोलताना शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “भाजपचं वागणं अनाकलनीय आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार स्वतः आमच्या पक्ष कार्यालयात आले होते. त्यांनीच सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला. आणि आता त्यांचे सर्वेसर्वा गिरीश महाजन ‘कुबड्या नको’ असे बोलत आहेत. हा शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा आहे.”
Ajay Boraste: शिवसेना विरोधी बाकावर बसण्यास तयार
बोरस्ते यांनी पुढे सांगितले की, “या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत. शिंदे साहेब जो आदेश देतील तो आम्ही पाळू. त्यांनी विरोधी बाकावर बसण्यास सांगितले, तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू.” शिवसेनेने हेही स्पष्ट केले की, भाजपच्या प्रस्तावावर दोन दिवसांपूर्वी सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता. उपमहापौर, स्थायी समितीसह अन्य महत्त्वाची पदे मिळतील, अशी अपेक्षाही शिवसेनेने व्यक्त केली होती. मात्र, गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण चित्र बदलले आहे.
Ajay Boraste: नाशिकमध्ये राजकारण तापले
दरम्यान, “महायुती सत्तेत असती तर आगामी सर्व निवडणुकांसाठी तिन्ही पक्षांना ते सोयीचे ठरले असते. मात्र आता संपूर्ण परिस्थितीचा आढावा आम्ही एकनाथ शिंदे यांना देणार आहोत,” असेही शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले. मंत्री गिरीश महाजन यांच्या एका वक्तव्यामुळे नाशिकमधील महापालिकेचे राजकारण तापले असून, भाजप–शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तणाव पुढील काळात कोणत्या दिशेने जाणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
गिरीश महाजनांनी केवळ दिलगिरी व्यक्त करू नये, तर...; महिला कर्मचारी माधवी जाधवांची एकच मागणी
