मुंबई : शिवसेनेच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघातील उमेदवार दिपाली सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाडांनी प्रचारादरम्यान दिपाली सय्यद यांचा माहेरवाशीण असा उल्लेख केला होता. मात्र जितेंद्र आव्हाडांसारखा भाऊ नको असं म्हणत दिपाली सय्यद यांनी आव्हाडांवर निशाणा साधाला. तसेच जितेंद्र आव्हाडांविरोधात आपण कमीत कमी 20 हजार मतांनी निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या एबीपी माझाच्या ब्रेकफास्ट न्यूज कार्यक्रमात बोलत होत्या.


जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाकांकडे लक्ष दिलं नाही. कारण मी माझ्या प्रचारात व्यस्त होते. आव्हाडांना गाणं गायला आवडतं, त्यांच्यात एक अभिनेता लपलेला आहे. तो त्यांना लोकांना दाखवायचा असतो, त्यामुळे ते कॅमेऱ्यासमोर आले की गाणं गातात. आव्हाडांनी मला बहीण मानलं आहे आणि ते 15 दिवसात माझी हकालपट्टी करणार असं बोलत आहेत. त्यामुळे असा भाऊ कोणत्याच बहिणीला नको असतो, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं.


या निवडणुकीत मी शंभर टक्के जिंकणार आहे. हे मी नाही तर कळवा-मुंब्रा परिसरातील लोक सांगत आहेत. कारण लोकांना याठिकाणी विकासासाठी बदल हवा आहे. मी याठिकाणी 20 हजारांहून अधिक मदाधिक्याने निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






कळवा-मुंब्रा मतदारसंघात लोकांचा आव्हाडांना विरोध आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक लोकांना भेटले, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जर मी निवडून आले तर याठिकाणी अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. मुंब्रा परिसरात लोक अंत्यत गलिच्छ परिसरात राहत आहे. मात्र तेथील स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप दिपाली सय्यद यांनी केला.

शिवसेनेकडून उमेदवारीची ऑफर

शिवसेनेकडून मिळालेल्या उमेदवारीवरही त्यांनी वक्तव्य केलं. कळवा-मुंब्रा विधानसभा उमेदवारीसाठी शिवसेनेने माझ्याशी संपर्क साधला होता. त्याआधी मी दिपाली भोसले सय्यद ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे करत होती. या दरम्यान मला उमेदवारीसाठी विचारण्यात आल्याने, लोकांसाठी काम करण्याची संधी मला मिळत असल्याने मी लगेच होकार दिला, असं दिपाली सय्यद यांनी सांगितलं.