अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमला राज्यभरातून रोषाचा सामना करावा लागला असला तरी नगरच्या जनतेने मात्र त्याला स्वीकारले आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम वॉर्ड क्रमांक 9 मधून 2000 पेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाला आहे.


ज्या भाजप पक्षाने छिंदमला निलंबित केलं, त्याच भाजपच्या उमेदवाराला छिंदमने पराभूत केले आहे. प्रदीप परदेशी हा भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे.

माजी उपमहापौर असलेल्या छिंदमने  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्याच्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्याला भाजपमधून बाहेर काढल्यानंतर त्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. विशेष म्हणजे गुन्हा दाखल असल्याने तो तडीपार असतानाही या निवडणुकीत विजयी झाला आहे.

छिंदम हा वॉर्ड क्रमांक 9 मध्ये अपक्ष उमेदवार आहे. याच वॉर्ड क्रमांक 9 मध्ये असलेल्या मतदान केंद्रात श्रीपादचा भाऊ श्रीकांतने पूजा केल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. या वादग्रस्त छिंदमच्या निकालाकडेही राज्याचं लक्ष लागले होते.

अहमदनगर महानगरपालिका निकालाची वैशिष्ट्ये 

- राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केडगाव येथे आघाडीला धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 4 उमेदवारांचा विजय झाला आहे तर 8 जागांपैकी 4 जागा शिवसेनेकडे तर 4 जागा भाजपकडे आल्या आहेत.

- भाजपचे खासदार दिलीप गांधी यांना मोठा धक्का.  गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी आणि सून दिप्ती गांधी हे दोघेही पराभवाच्या वाटेवर

- भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेल्या शिवाजी कर्डीले यांच्या दोन्ही कन्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी लढवत होत्या दोघींही विजयाच्या उंबरठ्यावर. मुलगी शीतल जगताप राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांची पत्नी

- कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी प्रचारात लक्ष न देऊनही निवडणूकीत मात्र आघाडी केली.

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या समारोपात सभा घेऊनही खासदार दिलीप गांधी यांना धक्का बसलाय.