Naigaon Vidhansabha Election : नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातून (Naigaon Vidhansabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शिरीष गोरठेकर (Shirish Gorthekar) यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. गोरठेकरांनी आपल्या समर्थकांची बैठक घेऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या या बंडामुळं नायगाव मतदारसंघात काँग्रेसला (Congress) मोठा फटका बसणार आहे.
शिरीष गोरठेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे चिरंजीव आहेत. नायगाव मतदारसंघात गोरठेकर यांची मोठी ताकद आहे . राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून त्यांनी उमेदवारी मागितली होती. पण ही जागा काँग्रेसला सुटली आहे. त्यामुळं काँग्रेसकडून मिनल खतगावकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळं शिरीष गोरठेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. माघार घेतील अशी अपेक्षा होती. मात्र समर्थकांची बैठक घेऊन त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभेसह आणि लोकसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता
दरम्यान, नायगाव विधानसभा मतदारसंघातील काँगेसचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण हे काँग्रेसकडून लोकसभेचे उमेदवार आहेत. शिरीष गोरठेकर यांच्या बंडामुळे नायगाव विधानसभा आणि लोकसभेतही काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं?
नायगाव विधानसभा मतदारसंघात नायगाव, धर्माबाद व उमरी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. 2009 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवार वसंतराव चव्हाण विरुद्ध राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर यांच्यात लढत झाली होती. वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला होता. तिसऱ्या क्रमांकावर जनसुराज्य शक्तीचे बालाजी बच्चेवार हे होते. 2014 मध्ये काँग्रेसकडून पुन्हा वसंतराव चव्हाण यांना संधी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात भाजपकडून राजेश पवार हे उमेदवार होते. तर अपक्ष म्हणून बापूसाहेब गोरठेकर हे उमेदवार होते. यात दुसऱ्यांदा वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. भाजपचे राजेश पवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. तर बापूसाहेब गोरठेकर तिसऱ्या क्रमांकावर होते. 2019 मध्ये काँग्रेसकडून पुन्हा वसंतराव चव्हाण यांना संधी दिली होती. त्यांच्या विरोधात भाजप-रिपाइंकडून राजेश पवार यांच्यात लढत झाली. यावेळेस राजेश पवार यांचा विजय झाला होता. वंचितकडून मारोतराव कवळे यांनी निवडणूक लढवली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यावेळी बापूसाहेब गोरठेकर यांनी भाजपात प्रवेश करून भोकर विधानसभा मतदारसंघात अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.