एनडीएला बहुमत मिळालं नाही तर 'हे' तिघे असतील पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार : शरद पवार
एबीपी माझा वेब टीम | 28 Apr 2019 12:49 PM (IST)
राष्ट्रवादी फक्त 22 जागा लढत आहे, या सर्व जागा आम्ही जरी जिंकल्या तरी बहुमताचा आकडा फार मोठा आहे. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी माझ्या नावाचा प्रश्नच येत नाही, असं पवार म्हणाले आहेत.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाविषयीचा अंदाज वर्तवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा गरम झाल्या आहेत. एनडीएला बहुमत मिळालं नाही तर ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरतील असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पवारांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरु आहे. दरम्यान, आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं पवारांनी आवर्जून म्हटलं आहे. राष्ट्रवादी फक्त 22 जागा लढत आहे, या सर्व जागा आम्ही जरी जिंकल्या तरी बहुमताचा आकडा फार मोठा आहे. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी माझ्या नावाचा प्रश्नच येत नाही, असं पवार म्हणाले आहेत. एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि मायावती हे मला पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय दिसतात, कारण त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्रिपदाचा अनुभव आहे, असेही पवार म्हणाले. माझं मत विचाराल तर एनडीएला यावेळी स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता फारच धुसर असल्याचेही पवारांनी म्हटलं आहे.