सोलापूर : पुण्यासह राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा झटका बसला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही मोठा पराभव झाल्याने दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी वाढला असून नुकतेच जाहीर झालेल्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणनीती आखली जात आहे. विशेष म्हणजे, आता झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे. त्यातच, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील हे कालच अजित पवारांना भेटले होते, त्यानंतर आज त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. माढा आणि पंढरपूर (solapur) तालुक्यात घड्याळ या चिन्हावर झेडपी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढणार असल्याचे कालच्या बैठकीत नक्की झाले, स्वतः अभिजीत पाटील यांनीच एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली.
महापालिकेत धूळधाण झाल्यानंतर जिल्हा परिषदेला ही सोलापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याचे नक्की झाले असून शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील हे जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजित पवारांच्या घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात ज्यांना तुतारीवर लढायचे त्यांनी तुतारीवर लढा आणि ज्यांना घड्याळावर लढायचे आहे, त्यांनी घड्याळावर लढा अशा स्पष्ट सूचना अजित पवार यांनी काल दिल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले. तसेच, शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार माढा आणि पंढरपूर तालुक्यात घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे कालच्या बैठकीत नक्की झाले. याबाबत स्वतः अभिजीत पाटील यांनीच एबीपी माझाशी बोलताना खुलासा केला. तसेच, इतर आमदारही याच पद्धतीने त्यांच्या सोयीनुसार तुतारी अथवा घड्याळ या चिन्हावर जिल्हा परिषद निवडणूक लढवू शकणार आहेत. सत्तेतून बाहेर असल्याचा फटका शरद पवार गटाला मोठ्या प्रमाणात बसत असल्याने पवार गटाचे माढा आणि करमाळ्याचे आमदार अभिजीत पाटील व नारायण आबा पाटील हे सुरुवातीपासून भाजपशी जवळीक साधून असल्याचे दिसत होते. तसेच माळशिरसचे उत्तम जानकर आणि मोहोळचे राजू खरे हे दोन आमदार एकनाथ शिंदे यांच्याजवळ जाताना दिसले होते. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी चिन्हावर निवडणूक लढविण्याच्या भाजप पॅटर्न अवलंबल्याने आता चारही आमदारांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळेच सत्तेत असलेल्या अजित दादा पवार यांच्यासोबत निवडणूक लढविण्याची भूमिका अभिजीत पाटील यांनी घेतली असून नारायण पाटील देखील याच मार्गाने जाणार असल्याचे समजते.
मोहोळ, सांगोल्यात काय होणार?
मोहोळ येथील पवार गटाचे तिसरे आमदार राजू खरे हे जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळ आणि धनुष्यबाण या चिन्हासोबत निवडणूक लढविणार असल्याचे समोर येत आहे. माळशिरस येथील आमदार उत्तम जानकर हे मात्र शरद पवार यांची तुतारी घेऊन निवडणूक लढविणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात महापालिकेप्रमाणे भाजप विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसणार आहे. सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपसोबत जाऊन निवडणूक लढविण्याची भूमिका स्पष्ट केल्याने आता सांगोल्यात शेकाप भाजप एकनाथ शिंदे गट आणि माजी आमदार दीपक साळुंखे गट असे एकत्रित निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.