मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा विजय झाल्यानंतरही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ईव्हीएमवर अविश्वास कायम आहे. निकालाचे बहुतांश कल हाती आल्यानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा ईव्हीएमवर शंका उपस्थित केली.

पवार यावेळी म्हणाले की, आता जो निर्णय लोकांनी दिला आहे तो स्वीकारला पाहिजे. मात्र मात्र लोकांच्या मनात ईव्हीएमवर शंका कायम आहे. अशी शंका याआधी कधीही घेतली नव्हती. मोठ्या प्रमाणात याआधी काँग्रेसने देखील विक्रमी जागा जिंकल्या मात्र कधी कुणी निवडणूक यंत्रणा आणि प्रक्रियेवर शंका घेतली नाही. मात्र आता घेतली जातेय, असे पवार म्हणाले. दरम्यान आता सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून भाजपच्या कांचन कुल यांचा लाखाहून अधिक मतांनी पराभव केला.

शरद पवार यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत बोलताना जर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे हरल्या तर माझा लोकशाहीवरील विश्वास उडून जाईल. तसेच ईव्हीएम मशिनचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. मला ईव्हीएम मशीनची चिंता वाटते. कारण माझ्यासमोर हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी मशीन ठेवली आणि मला बटन दाबायला सांगितलं. मी घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे, असंही पवार म्हणाले होते.



पवार यावेळी म्हणाले की, मोठ्या प्रमाणात याआधी काँग्रेसने देखील विक्रमी जागा जिंकल्या मात्र कधी कुणी निवडणूक यंत्रणा आणि प्रक्रियेवर शंका घेतली नाही. अगदी विरोधी पक्षांनी देखील घेतली नव्हती. मात्र यावेळी निवडणूक आयोग आणि देशाच्या नेतृत्वाविरोधात संशयाचं भूत देशात निर्माण झालं होतं, जे आधी कधी झालं नव्हतं. मात्र आता देशाच्या लोकांचा हा निर्णय मान्य आहे, असे पवार म्हणाले.


पवार यावेळी म्हणाले की, मी माढा मतदारसंघातून लढणार नव्हतोच. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे आधीच जाहीर केलं होतं. माढ्यात आमच्या सहकाऱ्यामध्ये संघर्ष होता, म्हणून मी कार्यकर्त्यांच्या भावना सांगितल्या होत्या, असे ते म्हणाले.मावळमध्ये पार्थची जागा न येणारी होती. न निवडून येणारी जागा जिंकण्यासाठी आम्ही पार्थला उमेदवारी दिली. मात्र तिथे आम्ही खूप चांगला बेस बनवला आहे, असे ते म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीच्या मताच्या गणिताबद्दल आम्ही अजून अभ्यास केलेला नाही. मात्र सध्या तरी तीन चार जागा वगळता काही विशेष प्रभाव नाही. वंचितचा काही मतदारसंघात फटका बसणार आहे. मात्र आम्ही याचा गांभीर्याने विचार करणार आहोत, असेही पवार म्हणाले.

ही निवडणूक देशाची होती, लोकांनी मोदींकडे पाहून मतदान केलं. मात्र विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगळी असते. मुद्दे वेगळे असतात. मोदींना एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटत नव्हतं, असे पवार म्हणाले. या निवडणुकीत राज ठाकरेंचे उमेदवार नव्हते, त्यांचे उमेदवार असते तर चित्र वेगळं असतं. त्यांची भूमिका मांडली, असे पवार म्हणाले.

बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या अनेक लोकांनी बारामतीत मुक्काम केला. मात्र काही फरक पडला नाही. त्यांना या निकालातून उत्तर मिळालं आहे. त्यांना लोकांनी त्यांचं स्थान दाखवलं. बारामतीत भाजपचे अनेक स्टार प्रवक्ते आले, मात्र लोकांनी त्यांना जागा दाखवली, असे पवार म्हणाले.

या निवडणुकीच्या प्लॅनिंगमध्ये काही चूक झाली नाही. आमच्या लोकांनी खूप चांगले प्रयत्न केले. आमच्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन काम केलं आहे. उद्याच्या निवडणुकांच्या दृष्टीने हे चित्र सकारात्मक आहे, असेही पवार म्हणाले.


संबंधित बातम्या