मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Election 2024) निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अनेक जाहीर सभा महाराष्ट्रात झाल्या. मात्र त्यांनी एकाही सभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली नाही. हाच धागा पकडत, शरद पवारांनी मिश्किल टीपणी केलीय. मोदी माझ्यावर टीका करत नाहीत हीच माझ्यासाठी चिंतेची बाब आहे, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलंय.  अजित पवार (Ajit Pawar) यांना पाडा असं आवाहन तुम्ही बारामतीकरांना करणार का, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का, वोट जिहादचा मुद्दा, प्रतिभा पवार प्रचारात कशा, अशा अनेक मुद्द्यांवर शरद पवारांनी मतं मांडली.


शरद पवार म्हणाले, मोदी माझ्यावर टीका करत नाहीत ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. गेल्या निवडणुकीत ज्या ज्या वेळी मोदी आले,माझ्यावर टीका केली आणि आमच्या जागा वाढल्या. म्हणूनच मी त्यांना निमंत्रण दिले की, मोदीजी, महाराष्ट्रात या आणि तुमच्या मन की बात बोला. त्यामुळे आमच्या जागा वाढतील. पण त्यांच्या सल्लागाराने सांगितले असावं की शरद पवारांना महाराष्ट्रात भाष्य करू नका. माझ्यावर बोलणे बंद आहे, पण राहुल गांधी आणि इतर नेत्यांवर टीका करणं सुरुच आहे. जसं प्रधानमंत्रीपदाचा सन्मान आम्ही ठेवला पाहिजे, तसचं विरोधी पक्षनेता पदाचा मान त्यांनी ठेवला पाहिजे. मोदी येतात आणि राहुल गांधींवर टीका करतात. हे लोकांना आवडत नाही"


अजित पवारांना पाडा असं आवाहन करणार का?


हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांना पाडा असं तुम्ही म्हणालात.परंतु अजित पवारांवर तुम्ही बोलला नाहीत?  अजून मी बारामतीला गेलेलो नाही, परवा मी बारामतीला जाणार आहे. तिथं मी काय बोलणार हे आता तुम्हाला सांगणार नाही.  तुम्ही दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांचा उल्लेख केला. हे दोघेही माझ्या पक्षाच्या तिकिटावर माझ्या फोटोसह भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात निवडून आले होते. जनतेने त्यांना भाजपच्याविरोधात मत देऊन निवडून आणलं होतं. परंतु त्यांनी धोकाधडी केली आणि ते भाजपसोबत गेले. ज्यांच्याविरोधात आम्ही मतं मागितली त्यांच्यासोबत हे सत्तेत असल्यामुळे मी बोललो आहे. कारण लोकांच्या सोबत त्यांनी धोका केला आहे, असं शरद पवार म्हणाले. 


सुनील तटकरेंच्या दाव्यावर भाष्य


राष्ट्रवादी अजित पवारांचे खासदार सुनील तटकरे यांनी दावा केला होता की अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शरद पवार आम्हाला पाठिंबा देण्याचं जाहीर करणार होते. त्याबाबत शरद पवार म्हणाले,  विधानसभेच्या अधिवेशनच्या काळात हे सर्वजण मला भेटायला आले होते. त्यावेळी आपण भाजपसोबत या असं ते मला म्हणाले. मात्र मी त्यांच्यासोबत गेलो नाही. शेवटच्या दिवशी मी त्यांना पाठिंबा देणार होतो असं जर ते म्हणत असतील तर आत्ता तुम्हाला काय दिसत आहे? मी त्यांना पाठिंबा दिला का? तर नाही. 


प्रश्न : अजित पवार म्हणाले प्रतिभाकाकींना नातवाचा एवढा पुळका का आला आहे? 


शरद पवारांचं उत्तर : अजित पवार आज नव्याने काय बोलले आहेत मला माहिती नाही मी ते पहिलं माहिती घेईल आणि त्यानंतर अधिकृतरित्या यावर बोलेन. 


प्रश्न : मुख्यमंत्री कोण होणार?


शरद पवारांचं उत्तर : सध्या महाराष्ट्राची निवडणूक सुरू आहे सगळ्या पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आम्ही निवडणुकीत निवडून आल्यानंतर याबाबत निर्णय घेऊ


लाडक्या बहि‍णींना एका हाताने दिलं, दुसऱ्याने घेतलं


दरम्यान, शरद पवारांनी यावेळी लाडकी बहीण योजनेवरही (Ladki Bahin Yojna Maharashtra) भाष्य केलं. लाडक्या बहिणीना आता त्यांना आणावं लागलं. त्यांनी हे राजकीय फायद्यासाठी केले आहे. लाडकी बहीण म्हणजे एका हाताने देणे आणि दुसऱ्या हाताने घेणे. कारण महागाई वाढली आहे, त्यामुळे निवडणुकीत याचा जास्त परिणाम होईल असे वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.
 
गेल्या काही वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या 63 हजार प्रकरणांची नोंद झाली आहे. दर तासाला 5 महिलांवर अत्याचार होतात. सर्वात जास्त प्रकरणं ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आहेत. फक्त पैसे देऊन होत नाही. महिला, शेतकरी यांना आधार देण्यासोबत सुरक्षित ठेवलं पाहिजे. युवांना रोजगार दिला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. 



2019 मध्ये काँग्रेसकडे फक्त एक जागा होती, आम्हाला 4 जागा मिळाल्या होत्या. 2024 च्या निवडणुकीत परिस्थिती बदलली. आम्ही मविआ म्हणून 30 च्या आसपास आहोत. लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळेल असे त्यांना वाटत होते पण तसे झाले नाही, असं शरद पवारांनी सांगितलं.  


2014 ला भाजपला पाठिंबा का दिला?   


मागितल्याशिवाय पाठिंबा द्यायचा नव्हता. शिवसेना भाजपसोबत  होती. शिवसेना भाजपसोबत वेगळी होऊ शकते का, आम्ही त्यांना वेगळं करु शकतो का यायची चाचपणी आम्हाला करायची होती. म्हणून ते राजकीय वक्तव्य केले होते. मदत केली नाही आम्ही फक्त बोललो होतो, असं शरद पवार म्हणाले. 


प्रश्न - पण नंतर शिवसेना भाजप सोबत सत्तेत बसली?,


पवार - पण नंतर झालं काय.. नंतर आम्हाला जे हवं होतं तेच झालं.. सरकार पडलं, शिवसेना आमच्यासोबत आली आणि शिवसेनेच्या नेतृत्वात आमचं सरकार आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असंही पवारांनी सांगितलं. 


उलेमा संघटनेवर भाष्य 


उलेमा संघटनेने काय म्हटले ते मला माहीत नाही, त्यांचे पत्रही आमच्या हाती आलेले नाही. आम्ही फक्त वर्तमानपत्रात वाचतो. पण अयोग्य मागण्या असतील तर ते आम्हाला मान्य नाही, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं.  


जनतेची साथ नसल्यानेच वोट जिहादचा मुद्दा


महाराष्ट्रातील जनता आपल्याला साथ देणार नाही हे सत्ताधारी पक्षाला कळून चुकले आहे, म्हणून ते त्याला जातीय बाजू देत आहेत. वोट जिहादची सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी केली. आम्ही केली नाही. जेव्हा त्यांना कळलं की निवडणुकीत महाराष्ट्राची जनता त्यांना समर्थन देत नाही, तेव्हा त्यांनी धार्मिक तेढ उभं करण्याचा प्रयत्न या वोट जिहादच्या माध्यमातून सुरु केला. आम्ही जिंकलो तर विरोधक म्हणाले की मुस्लिम मतांमुळे आम्ही जिंकलो. काही जागांवर मुस्लिम समाज जास्त आहेत त्यांनी आम्हाला जर मतदान केलं तर त्यांनी वोट जिहाद केला हे सांगणे योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले.  


संबंधित बातम्या 


Ajit Pawar: 'मी पेताडी, गंजेडी असतो तर ठीक, मी काकींना विचारणार नातवाचा पुळका...',अजितदादा प्रतिभाकाकींच्या प्रचारावर त्यांना विचारणार प्रश्न?