नाशिक : कुस्ती बरोबरीच्या पैलवानाशी खेळतात, लहान मुलांशी नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. जगात मुलांना अन्नाचा पुरवठा करण्यासंदर्भात जे देश आहेत त्याच्यामध्ये भारतातील मुलांना सगळ्यात कमी अन्न मिळतं. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा अन्नाचं प्रमाण मुलांना अधिक मिळतं. ही भारतासारख्या देशाला बातमी चांगली आहे का? असा सवाल करतानाच जो अन्नधान्याची निर्यात जगात करतो त्या देशातील मुलांना अन्न खायला मिळत नाही. ही बातमी जागतिक पातळीवर आपल्याबद्दल छापून येते एवढी बेईज्जत या लोकांच्या राजवटीत केली जाते अशी खंत  पवार यांनी निफाड येथील जाहीर सभेत व्यक्त केली.


पवार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांची दैना झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कारखाने आजारी पडले आहेत. मंदीचे संकट आलेले आहे. लोकांची रोजीरोटी जातेय.  आज ही सगळी संकट आज महाराष्ट्रात आली आहेत त्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याची धमक भाजपमध्ये नाही, असे पवार म्हणाले.  प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याची पावले टाकली ते लोकांना पसंत नाही असेही  पवार म्हणाले.

दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ऑफिस आहे. कॉंग्रेसचं कधी राज्य आलं तर कधी पराभव झाला. असे अनेक चढउतार पाहिलेल्या कॉंग्रेसच्या कार्यालयावर धाड घालत चार लोकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु आहे. निवडणूक सुरु असताना असा प्रकार घडणं योग्य नाही. मलाही त्रास देण्याचा प्रयत्न झाला असे ते म्हणाले.

ही काय राज्य चालवायची पद्धत आहे. कोण कुणाच्या ओळखीचा आहे एवढ्या मुद्दयावर तुम्ही गुन्हा दाखल करता. सत्ता आल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात आणि डोकं जाग्यावर ठेवायचं असतं असा सल्ला शरद पवार यांनी भाजप सरकारला दिला.