सातारा: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकी संदर्भात महायुती करायचे असेल तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि पालकमंत्र्यांनी बैठक बोलवावी आम्ही त्या बैठकीला जाऊ, असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते. शंभूराज देसाई यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्या मतानुसार जिल्ह्यातील आठही आमदार आणि दोन्ही खासदार यांना बैठकीत निमंत्रण दिलं होतं. मात्र आम्हालाही आश्चर्य वाटलं भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि दोन्ही मंत्री जिल्ह्यात असून सुद्धा बैठकीला आले नाहीत. पाठीमागच्या वेळचा हाच अनुभव आहे. पुढची भूमिका शिवसेना म्हणून आम्हाला घ्यावी लागेल, असं शंभूराज देसाई म्हणाले.
एका बाजूला महायुती करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा बैठक घ्यावी असं म्हणतात आणि इकडे बैठक सुरू असताना युती मधल्या एका जबाबदार मंत्र्यांन पाटण मतदारसंघाबाबत वक्तव्य करायचं. पालकमंत्री कोणी हे असू देत आपल्याला फरक पडत नाही हे वक्तव्य जयकुमार गोरे यांनी हे केलं असेल तरी याचा फरक पडतो की नाही पडत. घोडे मैदान लांब नाही, असं शंभूराज देसाई म्हणाले. मला त्यांच्यासारखी अहमपणाची किंवा डोक्यात सत्ता गेल्यासारखी भाषा मला करायची नाही आणि मी करणार नाही. त्यांनी डबल पॅकेज द्यायचं काय आणि पॅकेज म्हणजे काय हे एकदाचे जयकुमार गोरे यांनी सांगावं. असल्या कुठल्याही पॅकेजला माझ्या मतदारसंघातली जनता भाळणार नाही भुलणार नाही, असं जयकुमार गोरे म्हणाले.
सत्यजीतसिंह पाटणकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटातील 102 गावातील 1966 प्रमुख कार्यकर्त्यांनी जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अशी पॅकेजची भाषा माझ्या मतदारसंघाला लागू होणार नाही, असंही देसाईंनी म्हटलं.महायुती धर्म पाळण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करत आहोत. मात्र आमच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री आपल्या सहकारी मंत्र्यांच्या संदर्भात पालकमंत्री कोणीही असला तरी तरी फलटणचा पालकमंत्री हे रणजीत निंबाळकर आहेत असं जर बोलत असतील तर येणाऱ्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांना शिवसैनिक आणि लोक उत्तर देतील, असंही शंभूराज देसाई म्हणाले.
रामराजे नाईक निंबाळकर, नितीन काका पाटील, मकरंद आबा पाटील आम्ही एकत्र बसून चर्चा केली आहे. आम्ही एकत्र येण्यानं एवढ्या टोकाची भूमिका आमचे मित्र पक्ष घेत असतील तर सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे.शिवसेना म्हणून आजच्या बैठकीत जे काही चर्चा झाली यावर आज रात्री की उद्या सकाळी बसून आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करु,असं शंभूराज देसाई म्हणाले.