Shahajibapu Patil vs Babasaheb Deshmukh : सांगोलाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ देण्यासाठी गुवाहाटीला पोहोचले होते. दरम्यान, गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांचा काय डोंगर, काय झाडी...हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा शेतकरी कामगार पक्षाच्या बाबासाहेब देशमुख यांनी पराभव केलाय. दरम्यान, नुतन आमदार बाबासाहेब देशमुख हे नवा उपक्रम राबवणार आहेत. ज्या गावात जेवढा लीड, त्या गावात तेवढी झाडं लावणार, असं बाबासाहेब देशमुख म्हणाले आहेत. त्यांनी 25 हजार झाडं लावून सांगोला तालुका हिरवागार करण्याचा निर्णय घेतलाय.
काय झाडी काय डोंगार...शहाजीबापू पाटलांचा हा डायलॉग व्हायरल झाला आणि बापूंसह सोलापूरचं सांगोलाही राज्यात फेमस झालं...पण शहाजीबापूंच्या डायलॉमधले डोंगार आणि झाडी...हे सांगोल्यातले नव्हते बरं का....ते होते गुवाहाटीतले....पण शहाजीबापूंच्या सांगोल्यात काही वर्षांनी तुम्हाला हे चित्र नक्की दिसू शकतं...आणि त्यासाठी शपथ घेतलीये ती शहाजीबापूंना यंदाच्या निवडणुकीत झाडी आणि डोंगर दाखवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या डॉ. बाबासाहेब देशमुखांनी...
सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापच्या बाबासाहेब देशमुखांनी शहाजीबापूंचा 25 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला...या विजयानंतर देशमुखांनी एक मोठा संकल्प केला...ज्या गावात जितके मताधिक्य मिळाले आहे तेवढी झाडे त्या त्या गावात लावण्याचा संकल्प बाबासाहेब देशमुख यांनी केलाय.
25 हजार पेक्षा जास्त झाडं लावून सांगोला मतदारसंघ हिरवागार करण्याचं बाबासाहेब देशमुखांचं स्वप्न आहे...बाबासाहेबांच्या मागे एक फार मोठा राजकीय वारसाही आहे...सांगोल्यातून तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले... स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे बाबासाहेब हे नातू...
सांगोला आणि देशमुख....
---------------------------------------------
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सांगोला मतदारसंघात शेकाप आणि गणपतराव देशमुखांचं वर्चस्व राहिलंय
एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षातून गणपतराव देशमुख विक्रमी ११ वेळा आमदार झाले
2014 साली 87 वर्षांचे गणपतराव सांगोल्यातून शेवटची निवडणूक लढले आणि जिंकलेही
पण 2019 मध्ये गणपतरावांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख काही मतांच्या फरकानं पराभूत झाले
अनिकेत देशमुखांच्या पराभवाचं हे शल्य शेकापच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात होतं
यंदा डॉ. बाबासाहेब देशमुख जिंकले आणि पुन्हा एकदा देशमुखांच्या घरात आमदारकी आली...
बाबासाहेब देशमुखांचा विजय हा स्वर्गीय गणपतरावांच्या विचारांचा विजय असल्याची शेकापच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. आज मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला देशमुखांचा सत्कार करायचाय... पण आपला सत्कार करुणं, हार-फेटे घालणं अशा अनावश्यक गोष्टी न करता गावकऱ्यांनी झाडं लावावीत यासाठी देशमुख प्रयत्नशील आहेत. आणि म्हणूनच ज्या गावात जितकं मताधिक्य तितकी त्या गावात झाडं लावणं असा संकल्प त्यांनी केलाय.
गणपतराव देशमुख असो किंवा आता डॉ. बाबासाहेब देशमुख...गेली अनेक दशकं सांगोल्यातील मतदारांनी देशमुख घराण्याला मतांच्या रुपात भरभरुन प्रेम दिलंय...कृतज्ञता म्हणून डॉ. देशमुखांनी विकासकामं करण्य़ाचा चंग तर बांधलाच आहे..पण त्याच बरोबर पर्यावरणाची काळजी घेत..तब्बल 25 हजार झाडं लावण्याचा जो संकल्प सोडलाय तो कौतुकास्पद आहे.... इतर नेत्यांनीही यातून थोडाफार बोध घ्यावा हीच अपेक्षा, असं सांगोल्यातील लोक सांगतात. ..
इतर महत्त्वाच्या बातम्या