Thane Municipal Election: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मोठं यश मिळवलं. मात्र, ठाण्यात प्रभाग क्रमांक 13 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं 'शुभदीप' निवासस्थान आहे. याच प्रभागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शहाजी (गणेश) संपत खुस्पे यांनी मोठा विजय मिळवला. खुस्पे यांनी या प्रभागात 5 टर्म नगरसेवक राहिलेल्या शिवसेना उमेदवार व माजी महापौर अशोक वैती यांना पराभवाचा धक्का दिला. या विजयाची जोरदार चर्चा आहे. शिंदेंच्या प्रभागात मशाल पेटल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही थेट मातोश्रीवरून निरोप धाडत शहाजी खुस्पे यांना भेटीसाठी निरोप दिला. माजी खासदार राजन विचारे यांच्यासोबत त्यांनी आज  उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीवेळी केदार दिघे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सुद्धा उपस्थित होते. एका सामान्य शिवसैनिकाने मिळवलेला विजय सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

Continues below advertisement

आई वडिलांना अश्रू अनावर

दरम्यान, ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला केवळ एकच जागा मिळाली, पण त्या नगरसेवकाची चर्चा आहे. एकनाथ शिंदे ज्या भागात राहतात त्याच भागात मतदारांनी धनुष्यबाण सोडून मशाल चिन्हाला पसंती देत शहाजी खुस्पे यांना निवडून आणले. त्यांची ही पहिलीच निवडणूक असताना त्यांनी अशोक वैती या पाच टर्म नगरसेवक आणि माजी महापौर असलेल्या उमेदवारास चितपट केले. त्यामुळं देखील खुस्पे यांचा विजय मोठा मानला जात आहे. पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या शहाजी यांच्या विजयानंतर त्यांच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. पत्नी आणि आईचेही डोळे पाणावले.

तिकीट नाकारल्यामुळं मशालीच्या चिन्हावर निवडणूक

खुस्पे यांनी समर्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून काम केले आहे. मात्र त्यांना शिवसेना शिंदे गटाने तिकीट दिले नाही. अखेर त्यांनी मशाल उचलली आणि जिंकून देखील आले. अटीतटीच्या लढतीत खुस्पे यांनी 667 मतांनी विजय खेचून आणला. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाण्याची ओळख आहे. पण आता याच बालेकिल्ल्यात आणि त्यातही शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या प्रभागातच ठाकरेंची मशाल पेटवली.  समोर वैती यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचं आव्हान असतानाही तो भिडला, लढला आणि सरतेशेवटी जिंकल्याचंही त्यांनी सांगितलं. शहाजी खुस्पे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 12 हजार 860 मते मिळवली, तर शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांना 12 हजार 193 मतं मिळाली. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या