मुंबई : एक्झिट पोलनंतर शेअर बाजारामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. आज सोमवारी सकाळपासून आतापर्यंत शेअर बाजाराने तब्बल 1400 अंकांची उसळी मारली आहे. त्यामुळे सेन्सेक्स 39 हजारावर पोहोचला आहे. तर निफ्टी 400 अंकानी वधारला आहे.



एबीपी माझा-नेल्सनच्या सर्वेक्षणाप्रमाणेच देशातील अनेक वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळते आहे. या पोलनंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल जर खरोखरीच एक्झिट पोलप्रमाणे लागले तर शेअर बाजार यापेक्षाही जास्त तेजी येईल असा तज्ञांचा अंदाज आहे. मात्र एनडीएला पूर्ण बहुमत मिळालं नाही आणि बहुमताच्या आकड्यासाठी मोठीच कसरत करावी लागली तर त्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावरही होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आळा आहे.

एक्झिट पोलनंतर शेअर मार्केट परिसरातही कुणाची सत्ता येणार, कुणाच्या किती जागा येणार यावरही चर्चा रंगल्या आहेत. अनेक गुंतवणूकदारांचा अंदाज आहे की, एनडीएची सत्ता येईल, पण बहुमताच्या आकड्यासाठी कसरत करावी लागेल. तर अनेक गुंतवणूकदारांना असं वाटतंय की, एनडीएला पूर्ण बहुमत मिळेल आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील.