Dhananjay Mahadik on Satej Patil: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी थेट हल्ला चढवला आहे. “कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं” या टॅगलाईनवरून त्यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका करत, आता ही टॅगलाईन कोल्हापूरकरांना फसवू शकणार नाही, असं म्हटलं आहे.
आता त्यांची आमदारकी धोक्यात आली
महाडिक यांनी म्हटलं की, सतेज पाटील यांच्या हातात आता निवडणूक राहिलेली नाही. त्यांनी दिलेले उमेदवार अत्यंत दुबळे असून, गेल्या दोन निवडणुकांमध्ये केवळ टॅगलाईनच्या जोरावर जनतेची दिशाभूल करण्यात आली. तरुण वयात आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या; मात्र प्रत्यक्षात कोल्हापूरसाठी काहीही ठोस काम झालं नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच आता त्यांची आमदारकी धोक्यात आली असून, विधानपरिषद निवडणुकीत उभं राहणंही कठीण होईल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली असल्याचं महाडिक यांनी सांगितलं. याचवेळी त्यांनी महापालिका निवडणुकीचा अंदाज व्यक्त करताना, 81 पैकी 75 ते 78 नगरसेवक महायुतीचे निवडून येतील, तर चुकून दोन-चार नगरसेवक सतेज पाटील गटाचे येतील, असा दावा केला.
देवेंद्र फडणवीस मिसळ कट्ट्यावर
दरम्यान, भाजप आणि महायुतीने कोल्हापूर महापालिकेसाठी प्रचाराचा नवा आणि वेगळा पॅटर्न स्वीकारल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं. पारंपरिक बैठका, जाहीर सभा आणि मिरवणुका यांना बाजूला ठेवत, थेट टॉक शो च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिसळ कट्ट्यावर येऊन कोल्हापूरकरांशी संवाद साधणार आहेत. या टॉक शोमध्ये मुख्यमंत्र्यांची कोल्हापूरबाबतची संकल्पना आणि दृष्टीकोन थेट जनतेसमोर मांडला जाणार आहे. महाडिक यांनी महायुतीतील एकजूट अधोरेखित करत, “महायुती म्हणून आम्ही एकदिलाने काम करत आहोत. प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री किमान दोन वेळा येतील, असं नियोजन आहे,” असं सांगितलं. तसेच भाजपमध्ये गेली दहा वर्षे अनेक कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत होते, ते सर्व सक्षम असूनही महायुतीमुळे सर्वांना उमेदवारी देता आली नाही, याची आम्ही दिलगिरी व्यक्त केली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
सतेज पाटलांकडून थेट कोल्हापूरकरांशी संवाद
दुसरीकडे, “कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं” ही काँग्रेसची टॅगलाईन केवळ घोषणा नसून, आगामी महापालिका निवडणुकीसाठीचा संपूर्ण विकास आराखडा जनतेच्या सहभागातून तयार केला जाणार असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. जाहीरनामा तयार करण्यासाठी काँग्रेसने विशेष मोहीम हाती घेतली असून, कोल्हापूरकरांच्या मनातील भावना, अपेक्षा आणि गरजा थेट ऐकून त्यावर आधारित विकासाचा रोडमॅप ठरवला जाईल, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या