Satej Patil on Gokul Election: जनता ठरवेल कुणाचं मिटलं, कसं मिटलं, का मिटलं, तुम्हाला मिटवायचंच होतं आणि पॅनेल एकत्र करायचं होतं मग सहा महिने भांडणं का केली? सहा महिने 1400 संस्थांना त्रास तुम्ही तिघांनी मिळून का दिला? अदृश्य शक्तीचं नाव सुद्धा ते घेऊ शकत नाहीत, तेवढं धाडस त्यांच्यात नाही. दोषी सगळेजण आहेत, गोकुळवर प्रशासक आणला, सहा महिने गोकुळ बदनाम करायचा प्रयत्न केला. मग आजच तुमचं मिटवायचं होतं तर सहा महिन्यापूर्वीच तुम्ही मिटवून जागा वाटप करून शेवटी मुख्यमंत्रीच निर्णय घेणार होते, तिथेच बसून निर्णय घ्यायचा होता, अशा शब्दात राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी हल्लाबोल केला.
पहिले चेअरमन शशिकांत पाटील चुयेकर असतील
सतेज पाटील म्हणाले की, हे पॅनेल निवडून आल्यानंतर आमचे पहिले चेअरमन शशिकांत पाटील चुयेकर हे असतील. शशिकांत पाटील चुयेकर यांना शेवटच्या वर्षी चेअरमन करायचं ठरलं होतं, मांडव घातला होता, फटाकड्या गुलाल आणला होता, आता आणलेल्या या फटाकड्या, आणलेला गुलाल हा पुन्हा एकदा चुयेकर साहेबांच्या स्मृतीला अभिवादन देण्यासाठी या जिल्ह्यातल्या स्वाभिमानी लोकांनी आमच्यावर राहावं एवढी विनंती करतो, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले दुसरीकडे, गोकुळच्या निवडणुकीत आता राजकीय रणधुमाळीला धार आली आहे. महायुतीने जागावाटपाचा तिढा सोडवत पॅनलची दिशा स्पष्ट केल्यानंतर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीनेही आपलं पॅनल जाहीर केलं. आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत 25 उमेदवारांची नावे जाहीर केली यामध्ये प्रामुख्याने १८ नवीन चेहऱ्यांना संधी देत महायुतीसमोर राजकीय आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत दूध संघाच्या सत्तेसोबतच महायुती विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी अशी राजकीय प्रतिष्ठेची लढाई रंगण्याची चिन्हं आहेत.
राधानगरी तालुक्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे
दुसरीकडे, महायुतीचं पॅनेल घोषित झाल्यानंतर महायुतीला तगडा धक्का बसला आहे. अजित पवार गटातील गोकुळचे माजी संचालक किसन चौगले यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर त्यांना उमेदवारी सुद्धा देण्यात आल्याने राधानगरी तालुक्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे पी. एन. पाटील गटाला सुद्धा अवघी एका जागेवर बोळवण करण्यात आल्याने करवीर तालुक्यामध्ये मोठा असंतोष महायुतीमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे.
सात विद्यमान संचालकांना संधी
कार्यकर्त्यांकडून याबाबतच्या भावना सोशल मीडियामध्ये व्यक्त केल्या जात आहेत. गॅरेजवर बसून पी. एन. पाटील यांना कोणतीही घासाघीस न करता 6 जागा मिळत होत्या, मात्र महायुतीमध्ये असून सुद्धा अवघी 1 जागा वाट्याला आल्याने पी. एन. पाटील गटाची घोर निराशा झाल्याची भावना समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये पी. एन. पाटील गटाची नाराजी महायुतीला भोवणार का? याच्याकडे सुद्धा लक्ष असेल. दुसरीकडे, राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार घोषित करताना सतेज पाटील यांनी 7 विद्यमान गोकुळ संचालकांना पुन्हा एकदा संधी दिली आहे, तर तब्बल 18 चेहरे नव्याने रिंगणामध्ये उतरले आहेत. त्यामुळे काटाजोड लढत अपेक्षित आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
