Satej Patil: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी (Kolhapur Municipal Corporation) काँग्रेसची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. मात्र, एकतर्फी प्रचार करणाऱ्यांना सतेज पाटील यांनी गर्भित इशारा दिला. जर एखादा प्रभागातून एकच उमेदवार निवडून आला आणि अन्य तीन उमेदवार पराभूत झाले तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार असल्याचा गर्भित इशारा पाटील यांनी दिला. सतेज पाटील यांनी कसबा बावड्यात कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा बावडा- लाइन बाजारमधील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पाटील यांनी सांगितले की, माझी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विनंती असणार आहे की प्रभाग हा चार उमेदवारांचा आहे. त्यामुळे सर्वच उमेदवार सर्वच ठिकाणी पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने मत मागताना चौघांसाठी मते मागितली पाहिजेत. जर एखाद्याने एकच मागितलं तर ते लक्षात येतं असं ते म्हणाले. 

Continues below advertisement

त्या एका नगरसेवकाचा त्यादिवशी राजीनामा घेणार

त्यांनी सांगितले की प्रभागांमध्ये एकच उमेदवार निवडून आला आणि अन्य तीन उमेदवार पराभूत झाले तर निवडून आलेल्या त्या एका नगरसेवकाचा त्यादिवशी राजीनामा घेणार आहे. त्यामुळे मत मागताना संपूर्ण पॅनलसाठी मत मागा, अशी माझी विनंती असल्याचे पाटील यांनी सांगितलं. त्यांनी सांगितले की, महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे अत्यंत आव्हानात्मक असून वैयक्तिक मतांऐवजी संघटित प्रयत्नांनीच यश मिळवायचं आहे. कोल्हापूरातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला कारण आपण सर्वांनी कामे करून दाखवली. हा विश्वास टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता पुढं येणं गरजेचं आहे. 

काँग्रेसकडून 48 जणांची पहिली यादी जाहीर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 48 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये तीन कुटुंबांमध्ये सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. तब्बल 29 नवे चेहरे पहिल्या यादीत आहेत. यामध्ये 16 माजी नगरसेवकांना (तीन माजी नगरसेविका) सुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे. 

Continues below advertisement

कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्स कॅम्पेन 

दरम्यान, सतेज पाटील यांनी कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं कॅम्पेन करत नवीन टॅगलाईन आणली आहे. यानुसार कोल्हापूर मनपासाठी लोकांमधून सूचना मागवून जाहीरनामा सादर केला जाणार आहे. यासाठी शहरवासियांशी ते सकाळीच गाठून संवाद साधत आहेत. पहिल्या ताराबाई पार्क, नागाळा पार्क परिसरात माॅर्निग वाॅकला आलेल्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आज (28 डिसेंबर) राजारामपुरीत नागरिकांशी संवाद साधला. 

इतर महत्वाच्या बातम्या