Satara ZP Election : जयकुमार गोरे, महेश शिंदे, नरेंद्र पाटील ते मदन भोसलेंची प्रतिष्ठा पणाला, कुटुंबीय रिंगणात, सातारा जिल्हा परिषदेसाठी 67.80 टक्के मतदान
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्राथमिक आकडेवारीनुसार 67.80 टक्के मतदान झालं आहे. यावेळी नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात होते.

Satara ZP election 2026 सातारा : मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या सातारा जिल्हा परिषदेसाठी मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं. जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर कार्यकर्ते आमने सामने आल्याच्या घटना देखील घडल्या. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या 129 गणांसाठी मोठ्या उत्साहात मतदान पार पडलं आहे. सातारा जिल्ह्यात प्राथमिक आकडेवारीनुसार 67.80 टक्के मतदान झालं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या समजल्या जातात. मात्र, यावेळी साताऱ्यात नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात असल्यानं सर्वांचं लक्ष लागलं आहे. मंत्री जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, माजी आमदार नरेंद्र पाटील, माजी आमदार मदन भोसले यांचे कुटुंबीय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिंगणात होते. यामुळं निवडणुकीतील चुरस वाढल्याचं पाहायला मिळालं.
साताऱ्यात नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात
कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनी भाजपकडून खटाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल पाटील यांनी त्यांना आव्हान दिलं.
पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या प्राची नरेंद्र पाटील यांनी निवडणूक लढवली. त्या नरेंद्र पाटील यांच्या पत्नी आहेत. शिवसेनेकडून मृणाल पाटील यांनी या गटातून निवडणूक लढवली.
वाई तालुक्यात माजी आमदार मदन भोसले यांची मुलगी सुरभी भोसले यांनी पंचायत समितीच्या रिंगणातून निवडणुकीच्या राजकारणात पाऊल ठेवलं. भुईंज पंचायत समिती गणातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. शितल वारागडे यांनी आव्हान उभं केलं.
कराडमध्ये येळगाव जिल्हा परिषद गटातून दिवंगत नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरुद्ध आनंदराव पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली.
औंध जिल्हा परिषद गटातून मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांनी औंध जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा फडतरे यांनी निवडणूक लढवली आहे. आंधळी जिल्हा परिषद गटातून जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे निवडणूक लढवली, त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या दिपाली जगदाळे यांनी आव्हान उभे केलं.
माण तालुक्यातील मार्डी जिल्हा परिषद गटात दिवंगत नेते सदाशिव पोळ यांच्या कुटुंबातील व्यक्तींमध्येच लढत होतेय. सोनल मनोजकुमार पोळ या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढत आहेत. तर, भाजपकडून भारती संदीप पोळ निवडणूक लढवत आहेत.
फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांचा मुलगा सह्याद्री कदम देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सह्याद्री कदम कोळकी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली, त्यांच्यासमोर भाजपच्या जयकुमार शिंदे यांचं आव्हान होतं.
विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढलेल्या अरुणादेवी पिसाळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बावधन जिल्हा परिषद गटातून अरुणादेवी पिसाळ यांच्या कन्या दिप्ती पिसाळ यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऋतुजा शिंदे रिंगणात आहेत.





















