सातारा :पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या (Pune Division Teachers Constituency) मतदार यादीतील एका भयंकर चुकीमुळे प्रशासकीय कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. साताऱ्यातील वाई तालुक्यातील मतदार प्रशांत बोंबले यांच्या नावाऐवजी मतदार यादीत चक्क 'प्रशांत दादा साहेबाची बॉम्बस्फोट' अशी अत्यंत विचित्र आणि गंभीर नोंद झाल्याचे उघडकीस आले आहे.
प्रशांत बोंबले यांच्या वडिलांचे नाव 'दादासाहेब' आहे, मात्र प्रणालीतील तांत्रिक आणि भाषांतराच्या चुकीमुळे त्यांच्या नावात 'बॉम्बस्फोट' असा शब्द जोडला गेला. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हा प्रकार सोशल मीडियाद्वारे निदर्शनास आणून दिल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
Rohit Pawar Voter List Error : रोहित पवारांनी उघड केला प्रशासनाचा सावळागोंधळ
आमदार रोहित पवार यांनी ही चूक प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मतदार यादी तयार करताना अशा प्रकारचा निष्काळजीपणा कसा होऊ शकतो? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या वादानंतर सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. मतदार यादी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध केली जाते. प्रशांत बोंबले यांचे नाव इंग्रजी भाषेत योग्य नोंदवले गेले होते, मात्र मराठी भाषांतर (Marathi Translation) करताना सॉफ्टवेअर किंवा मानवी चुकीमुळे ही विचित्र नोंद झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
District Collector Satara Explanation : संबंधित कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
या गंभीर चुकीबाबत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासनाने संबंधित चुकीच्या नावाची दुरुस्ती तातडीने केली आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी दुरुस्त केलेली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तथापि, अशा प्रकारची संवेदनशील चूक होणे अजिबात अपेक्षित नव्हते, असे सांगत या प्रकरणात जे अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
Voter Registration Process Question : दबावामुळे मतदाराची मौन बाळगण्याची भूमिका?
दरम्यान, ज्या प्रशांत बोंबले यांच्या नावात ही भयंकर चूक झाली, त्यांनी या विषयावर माध्यमांशी बोलणे टाळले आहे. त्यांच्यावर स्थानिक पातळीवरून प्रशासकीय किंवा राजकीय दबाव असल्यानेच त्यांनी प्रतिक्रिया दिली नसल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे एका मतदाराचे नाव मतदार यादीत नोंदवताना त्याची पडताळणी कशी होते? आणि अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी अशा नोंदी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासल्या जातात की नाही? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रशासनाने चूक मान्य केली असली तरी 6 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम यादीत प्रशांत बोंबले यांचे नाव अचूक येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा:
