मुंबई : भाजपने या निवडणुकीत 400 (संपूर्ण एनडीए) पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 300 आकडा गाठता आलेला नाही. दुसरीकडे काँग्रेससह विरोधी बाकावरील पक्षांच्या जागा वाढल्या आहेत. महाराष्ट्रातही मतदारांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकली आहेत. येथे महाविकास आघाडीने 30 जागा जिंकून मुसंडी मारली आहे. दरम्यान महाराष्ट्रात सातारा या मतदारसंघाची विशेष चर्चा झाली. या जागेवर पिपाणी या चिन्हामुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाला मोठा फटका बसला आहे. 


पिपाणी, तुतारी वाजवणारा माणूस यामुळे गोंधळ?


निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह दिलेले आहे. दुसरीकडे अनेक मतदारसंघांतही अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आले होते. त्यामुळे पवार यांच्या उमेदवाराला मिळणारी मतं फुटण्याची भीती व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात अनेक मतदारसंघांत ही भीती खरी ठरली. बीड जिल्ह्यात पिपाणी हे चिन्ह असणाऱ्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. दुसरीकडे साताऱ्यातही हीच स्थिती राहिली. पिपाणीला मिळणारी मतं कदाचित  शरद पवार यांच्या 'तुतारी वाजवणरा माणूस' या चिन्हाला पडली असती तर येथे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला असता. 


...तर साताऱ्यात वेगळे चित्र असते?


आमच्या पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असे आहे. त्यामुळे अन्य उमेदवाराला पिपाणी हे चिन्ह देऊ नये, अशी मागणी पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केलीहोती. पिपाणी या चिन्हामुळे मतदारांमध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणऊस यात गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने घेतली होती. साताऱ्यातील निकाल पाहून पवार गटाची ही भीती खरी ठरल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह उमेदवाराला दिले नसते तर साताऱ्यात कदाचित वेगळे चित्र असते,  असे मत व्यक्त केले जात आहे. 


साताऱ्यात कोणाला किती मतं मिळाली?


साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली. उदयनराजे यांना एकूण 5 लाख 71 हजार 134 मतं पडली. त्यानंतर पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 5 लाख  38 हजार 363 मतं पडली. म्हणजेच शिंदे यांचा 32 हजार 771 मतं कमी पडली. दुसरीकडे याच मतदारसंघात पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली. 


 


हेही वाचा :


Lok Sabha Election 2024 Result: देशातील वारं बदललं, NDA सरकार स्थापनेपूर्वी राजकारणात मोठा ट्विस्ट येणार? नितीश कुमार-तेजस्वी यादव एका विमानाने दिल्लीला


Beed Election Result 2024: बीडमध्ये मराठा फॅक्टरने सगळ्या समीकरणांचा पार चोळामोळा केला, विजयानंतर बजरंग बाप्पा रात्री अडीच वाजता मनोज जरांगेंच्या भेटीला


NDA Meeting: दिल्लीत भाजपनं बोलावली NDA ची बैठक, अजित पवारांची दांडी; राजकीय घडामोडींना वेग