सोलापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र पाहायला मिळत असून 288 मतदारसंघातील सर्वच नेतेमंडळी प्रचाराच्या कामात व्यस्त झाले आहेत. दिवाळीचे फटाके फुटल्यानंतर आता प्रचारतोफांचे आवाज ऐकायला येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची लढत मानली जात असलेल्या सांगोला (Sangola) विधानसभा मतदारसंघात जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारण, काय झाडी, काय डोंगर, काय हाटील म्हणणारे शिंदेंच्या शिवसेनेचे सेलिब्रिटी आमदार शहाजी बापू पाटील याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शहाजी बापूंना पाडण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाने शड्डू ठोकला असून शहाजी पाटील (Shahaji bapu patil) यांनीही जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. येथील मतदारसंघात शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार दीपक साळुंखे यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून शहाजी बापूंना आव्हान देत त्यांच्यावर टीकेची झोड उडवली. तसेच, गत निवडणुकीत त्यांच्यासाठी प्रचार केल्याचंही म्हटलं आहे. 


गेल्या सहा निवडणुका मी विजयी आमदारांचा प्रचारप्रमुख म्हणून काम केले असून मला तालुक्याची खडान खडा माहिती आहे. कोणत्या वस्तीवर गेल्यावर कोणतं कुत्र भुंकतं आणि कोणतं गप्प बसतं हे सुद्धा मी सांगू शकतो, असा टोला ठाकरे गटाचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी लगावला. गेल्या निवडणुकीत एबी फॉर्म मिळून देखील मला उमेदवारी ठेवता आली नव्हती. मात्र, त्यावेळी शहाजी बापूंच्या प्रचाराला आलेल्या उद्धव ठाकरेंनी यंदा आमचं सीट निवडून आणा असे सांगितल्यावर मी बापूंना आमदार करून दाखवले. मित्राला त्याची जाणीव आहे का नाही हे त्याला माहिती मात्र उद्धव साहेबांनी ही जाणीव ठेवली आणि मला यावेळी उमेदवारी दिली, असा टोलाही दीपक साळुंखे यांनी आमदार शहाजी बापूंना लगावला. सांगोला मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होत असून महाविकास आघाडीकडूनच दोन उमेदवार मैदानात आहेत. दीपक साळुंखे यांना शिवसेना महायुतीचे शहाजी बापू पाटील आणि सीपीएमचे बाबासाहेब देशमुख यांना   


माझा विजय तर निश्चित झालेला आहे, फक्त पुढचं लीड जे असेल ते येत्या पंधरा दिवसात किती वाढवायचे याचे काम सुरू आहे. माझा उमेदवारी अर्ज भरतानाची गर्दी बघून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, हा फक्त ट्रेलर होता आता 10 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेवेळी सर्व गर्दीचे विक्रम मोडीत निघतील असा विश्वासही दीपक साळुंखे यांनी व्यक्त केला आहे. दीपक साळुंखे यांनी आपल्या प्रचाराचा आज शुभारंभ सांगोल्याचे ग्रामदैवत अंबिका माता मंदिरात श्रीफळ वाढवून केला. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगोल्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली असून येथे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उबाठा सेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासमोर आता दीपक साळुंखे आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख या दोघांचे आव्हान असणार आहे.