अमृतसर : 1984 च्या शीख दंगलीवरून काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पित्रोदांच्या वक्तव्यानंतर देशभरातील अनेक नेत्यांनी पित्रोदांना लक्ष्य केले आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील पित्रोदांना सुनावलं आहे. "अशा प्रकारचं वक्तव्य करायला सॅम पित्रोदांना लाज वाटायला हवी होती", असे सुनावत राहुल गांधी यांनी पित्रोदांना घरचा आहेर दिला आहे.
पित्रोदा यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना "1984 मध्ये जे झालं ते झालं, तुम्ही 5 वर्षात काय केलं ते सांगा?" असे म्हणत प्रश्न उपस्थित केले होते. या वक्तव्यावरुन पित्रोदा आणि काँग्रेस सध्या भारतीय जनता पक्षाच्या रडारवर आहेत.
राहुल गांधी म्हणाले की, "पित्रोदा यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याची लाज वाटायला हवी, याबाबत पित्रोदा यांनी देशाची माफीदेखील मागायला हवी. पंजाबमधील फतेहगड साहीब या मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अमर सिंह यांच्या प्रचारासाठी काँग्रेसने प्रचारसभेचे आयोजन केले होते. या सभेत राहुल बोलत होते."
राहुल म्हणाले की, "सॅम पित्रोद यांनी 1984 च्या शिखविरोधी दंगलीबाबत जे काही विधान केले, ते चुकीचे आहे. त्यासाठी त्यांनी देशाची माफी मागयला हवी. ही गोष्ट मी इथे सार्वजनिकरित्या सांगत आहे की, मी त्यांना माफी मागण्यास सांगितले आहे. मी त्यांना म्हणालो की, पित्रोदाजी तुम्ही जे विधान केले आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे."
1984 च्या दंगलीमुळं खूप त्रास झाला : राहुल
राहुल गांधी म्हणाले की, "मला वाटतं सॅम पित्रोदा यांचं मत पक्षाच्या विचारधारेच्या वेगळं आहे, यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे. 1984 सालच्या या दंगलीमुळे खूप त्रास झाला. न्याय व्हायला हवा. यासाठी जबाबदार असलेल्या अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी."
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी या प्रकरणी माफी मागितली. माझी आई सोनिया गांधी यांनी माफी मागितली आहे. ही दंगल आपल्यासाठी एक मोठी दुर्घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सॅम पित्रोदांची माफी
दरम्यान पित्रोदा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून भाजप आपल्या कमजोऱ्या लपविण्यासाठी शब्दच्छल करत आहे, असे ते म्हणाले. दंगलीसंदर्भात प्रश्न विचारला असता पित्रोदा यांनी गुरुवारी आता 1984 सालच काय आहे? तुम्ही पाच वर्षात काय केलं ते सांगा. 1984 मध्ये जे झालं ते झालं, आताच बोला, असं म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर भाजपने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी हात जोडून माफी मागावी आणि पित्रोदा यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी केली होती.
सॅम पित्रोदांना लाज वाटायला पाहिजे, राहुल गांधींचा घरचा आहेर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 May 2019 05:43 PM (IST)
1984 च्या शीख दंगलीवरून काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पित्रोदांच्या वक्तव्यानंतर देशभरातील अनेक नेत्यांनी पित्रोदांना लक्ष्य केले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -