मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याविरोधात माहीम विधानसभा मतदारसंघात शड्डू ठोकणाऱ्या सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अवघ्या तासभराची वेळ शिल्लक असताना नवी भूमिका घेतली आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात मी निवडणुकीत उभा असेन तर अमित ठाकरे हे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. कारण काही विशिष्ट जाती-धर्माचे लोक अमित ठाकरे यांना मतदान करणार नाहीत. त्यामुळे अमित ठाकरे हे माहीममध्ये निवडून येणे अवघड आहे. त्यामुळे मी माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणे, कसे गरजेचे आहे, हे समीकरण मी राज ठाकरे यांना समजावून सांगणार आहे. त्यासाठी मी राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले. सदा सरवणकर यांच्या या भूमिकेमुळे माहीम विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे.


महायुतीचे जास्त उमेदवार निवडून आले पाहिजेत, यासाठी मनसेने उमेदवार मागे घ्यावेत, या अटीवर मी माहीम विधानसभा मतदारसंघातून माघार घेण्याचा विचार केला होता. काही ठिकाणी मनसेने तशी तयारी दाखवली आहे. मात्र, माझं म्हणणं आहे की, मी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अमितजी निवडून आलेच पाहिजेत. ही माझी भावना आहे. या मतदारसंघात अमित ठाकरे निवडून येतील, याची खात्री नाही. ही परिस्थिती मी राज ठाकरे यांना समजावून सांगणार असल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले. त्यामुळे आता सदा सरवणकर हे राज ठाकरे यांची भेट घेऊन काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 


माहीम विधानसभेचं समीकरण काय?


सदा सरवणकर यांच्या दाव्यानुसार, माहीम विधानसभा मतदारसंघात जैन किंवा अन्य जातीधर्माचे काही लोक आहेत. या समाजात मनसेविरोधात भावना आहे. हे मतदार मनसेला मतदान करणार नाहीत. हे सगळं समीकरण राजसाहेबांना समजावून सांगण्यासाठी मी चाललो आहे. काही समाजामध्ये मनसेबद्दल असणारा राग हा मतांद्वारे प्रदर्शित होईल. त्यामुळे अमित ठाकरे यांचा पराभव होऊ नये, ही आमची भावना आहे. उलट माहीम विधानसभेत मी माघार घेतली तर काही अंशी अमित ठाकरे निवडून येण्याची शक्यता आहे. मी तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आहे. मी येथून उभा राहिलो तर अमित ठाकरे यांना कशाप्रकारे फायदा होईल, हे मी राज ठाकरे यांना सांगणार आहे. मी उमेदवारी अर्ज मागे घेऊन तिसऱ्याला फायदा होईल. अमित ठाकरे यांची वाट बिकट होईल. भाजपचे काही नेते अमित ठाकरे यांना पाठिंबा देत आहेत. त्यांचे राज ठाकरे यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. पण माहीमधील तळागाळातील भाजपचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असे सदा सरवणकर यांनी सांगितले.


आणखी वाचा


सुनील शेळकेंचा गेम होणार?, मावळ पॅटर्नला राज ठाकरेंचाही मनसे पाठिंबा; बाळू भेगडेंनी घेतली भेट