Rupali Chakankar : ज्यांनी ज्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली, त्यांच्या विरोधात कदाचित आम्ही रस्त्यावर उतरू शकलो नाही, पण त्यावेळेस तळपायाची आग मस्तकात गेली होती असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं. खऱ्या अर्थाने आता राग व्यक्त करायची वेळ आली आहे असं म्हणत नाव न घेता चाकणकर यांनी भाजपवर टीका केली. 

Continues below advertisement

संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांविरोधात लढा फक्त आपणच देऊ शकतो

ज्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली होती, त्यांच्या विरोधात लढा फक्त आपणच देऊ शकतो असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. तो लढा म्हणजे शिव शाहू फुले आंबेडकरांचा हा झेंडा  आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. अजित दादांचं राजकारण म्हणजे सर्व समावेशक आहे. जालन्यातील प्रचार सभेमध्ये रूपाली चाकणकर यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपवर निशाणा साधला आहे.

ठाकरे बंधू वैफल्यामधून एकत्र आलेत, तटकरेंची टीका

ठाकरे बंधू आता वैफल्यामधून एकत्र आलेले आहेत. त्यामुळं ते काय बोलतात त्यांना मी फारसं महत्त्व देत नाही, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. एवढीच त्यांची  महाराष्ट्रात ओळख आहे. बुलढाण्याच्या पलीकडे फारशी ओळख त्यांची कधीही नव्हती, त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही असे तटकरे म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला खासदार सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर दिलं. अजित दादा आठ वेळेला विधानसभेला लाखाच्यावर फरकाने निवडून आले आहेत. या राज्यातले सर्वाधिक अर्थसंकल्प त्यांनी मांडले आहेत. गेले अनेक वर्ष राज्यातल्या जनतेने त्यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. वचनाची पूर्तता केल्यामुळं त्यांच्यामागे जनता उभी राहते असे तटकरे म्हणाले. राज्याच्या राजकारणामध्ये आपण 95 सालापासून पाहिलं तर युती आणि आघाडीच्या राजकारणाची परिहार्यता आली आहे. विरोधकांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या जनतेने, लोकसभेला त्यांना जे अभूतपूर्व यश मिळालं, त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले विरोधक आता या निवडणुकीमध्ये इतके हतबल झाले की त्यांना स्वतःची स्पेस शोधता शोधता कंदील लावायला लागलेत असे तटकरे म्हणाले. 

Continues below advertisement

सपकाळांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित दादांनी मंत्री मंडळातून बाहेर पडावं आणि भाजपवर टीका करावी असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, सपकाळांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, त्यांना विधानसभेवरती निर्वाचित होता आलं नाही, त्यामुळे आठ वेळेला लाखांच्या फरकाने निवडून आलेल्या नेतृत्वावर काय बोलावं असा टोला सुनील तटकरे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना लगावला. ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत एवढीच त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे, बुलढाण्याच्या पलीकडे त्यांची फारशी ओळख कधीच नव्हती असा देखील जोरदार टोला सुनील तटकरे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना लगावला.

विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन रवींद्र चव्हाण यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केलेली आहे. विलासराव महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला होता असे तटकरे म्हणाले.