Continues below advertisement

लातूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी लातूरमध्ये केलेल्या एका वक्तव्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या (Vilasrao Deshmukh) आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही असं रवींद्र चव्हाण म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांवर एक वक्तव्य केल्यानंतर एकच खळबळ उडाली.

Continues below advertisement

या मेळाव्यास भाजप नेते आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात महापालिका निवडणुकीसाठीच्या भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

Ravindra Chavan Statement On Vilasrao Deshmukh : नेमकं काय म्हणाले रवींद्र चव्हाण?

कार्यकर्त्यांना संबोधित करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, "कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लक्षात येते की लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही."

सत्तेचा माज, हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया

रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. आज त्यांच्याबद्दल हे सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूरात येऊन बरळून जातात की साहेबांच्या आठवणी पुसल्या गेल्यात. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख साहेबांचं लातूर शी असलेलं नातं. लातूरच्या कर्तुत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही, भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा!"

Vilasrao Deshmukh Latur : काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप

विलासराव देशमुख हे राज्याच्या राजकारणातील मोठे नेतृत्व होतं. लातूर म्हणजे विलासराव देशमुख असं समीकरण होतं. आता रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य केल्यानंतर त्यावर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

मेळावा संपल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलणे टाळत तात्काळ निघून जाणे पसंत केले. त्यामुळे विलासराव देशमुखांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर अधिक खुलासा न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला आणखी धार आली आहे. आता या वक्तव्यावर काँग्रेसकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा: