रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्याकडे २६ सप्टेंबरला राजीनामा दिला होता. आणि 28 तारखेला सदाभाऊ खोतांच्या संघटनेत प्रवेश केला होता. तुपकर हे गेली अनेक वर्षे शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ऐन निवडणुकीत त्यांनी शेट्टी यांची साथ सोडल्याने हा शेट्टी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यांनी पुन्हा स्वाभिमानीत प्रवेश केल्याने शेट्टी यांची ताकत वाढली आहे.
प्रवेशानंतर रविकांत तुपकर म्हणाले की, तिकडे जाणे माझी चूक होती. मी त्याबद्दल शेतकऱ्यांची माफी मागतो. मी सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की चळवळीतला कुठलाही कार्यकर्ता उभा असेल तर त्याच्याविरुद्ध प्रचार करणार नाही. माझा शेट्टी यांच्यासोबत कधीही वाद नव्हता. काही अंतर्गत वाद होते ते आम्ही मिटवले आहेत. संघटनेत काही अंतर्गत कुरघोड्या झाल्या. मात्र आता सगळं ठीक आहे, मी अन्य कुणाबद्दलही काही बोलणार नाही, असे संस्कार आम्हाला राजू शेट्टी यांनी दिलेले नाही, असे तुपकर म्हणाले. आता चळवळीतील लढाई 'आर या पार'चीच असणार आहे. आता नव्या जोमाने आम्ही प्रचारात कामाला लागणार आहोत, असेही ते म्हणाले.
दरम्यान रविकांत तुपकरांनी कुठलीही अपेक्षा न करता पुन्हा प्रवेश केला आहे. त्यांना तिकडे पाठवण्याची खेळी वगैरे नव्हती, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
रविकांत तुपकर हे राजू शेट्टींचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जातात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं युती सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णय घेतल्यानंतर तुपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. सदाभाऊ खोत यांनी मात्र सरकारमध्ये राहणे पसंद केल्याने शेट्टी आणि खोत यांच्या संबंध कमालीचे ताणले गेले होते. मात्र निवडणुकांच्या तोंडावर तुपकर यांनी सदाभाऊ खोत यांच्या संघटनेत प्रवेश केल्याने खळबळ उडाली होती.