मुंबई: भाजपने विधानसभा निवडणुकीसाठीच्या 99 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये मुंबईतील 14 उमेदवारांचा समावेश आहे. ही उमेदवारी प्रसिद्ध होण्यापूर्वी मुंबईतील 5 आमदारांना खराब कामगिरीमुळे डच्चू मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. यामध्ये घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम (MLA Ram Kadam) यांचाही समावेश होता. राम कदम यांचा पत्ता कट होणार या बातमीने मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, रविवारी जाहीर झालेल्या उमेदवारी यादीत (BJP Candidate List) नाव दिसताच राम कदम यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला.
राम कदम हे घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून (Ghatkoper West constituency) 2009 मध्ये मनसेच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडून आले होते. पहिल्याच टर्ममध्ये राम कदम यांनी 'डॅशिंग आमदार', 'दयावान आमदार' अशी प्रतिमानिर्मिती करायला सुरुवात केली. राम कदम यांचे लक्षवेधी पोस्टर्स कायमच चर्चेचा विषय ठरायचे. 2009 मध्ये घाटकोपरमध्ये त्यांनी आयोजित केलेला दहीहंडी उत्सव आणि त्यासाठी केलेली जोरदार बॅनरबाजीला राज ठाकरे यांच्या करिष्म्याची साथ लाभल्याने राम कदम नवखे असूनही निवडून आले होते. मात्र, 2014 साली राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमांमुळे कायमच चर्चेत
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राम कदम यांनी 'डॅशिंग आमदार', 'दयावान आमदार' या आपल्या प्रतिमेला साजेसे असे उपक्रम मतदारसंघात राबवले. कीर्तन, श्रावणबाळ पुरस्कार, शालेय विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टर राईड अशा विविध उपक्रमांमुळे ते कायमच चर्चेत राहिले. त्यांचा दहीहंडी उत्सव हादेखील मुंबईतील गोविंदा मंडळाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आला आहे. या सगळ्याला राम कदम यांनी धार्मिक राजकारण आणि आक्रमक हिंदुत्त्वाची जोड दिली होती.
आक्रमक हिंदुत्त्वाचे राजकारण अंगिकारले
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआची सत्ता आल्यानंतर राम कदम यांनी आक्रमक हिंदुत्त्वाचे राजकारण अंगिकारले. भाजपच्या आक्रमक प्रवक्त्यांपैकी एक म्हणून त्यांचा लौकिक वाढू लागला होता. यासोबत राम कदम यांच्याकडून मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या काशी यात्रा हा कायमच चर्चेचा विषय ठरत आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम कदम यांनी 'केदारनाथ यात्रा' आणि 'अयोध्या यात्रा' काढून हिंदुत्त्वाचा मुद्दा आणखी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
लाडक्या बहिणींना साडीवाटप
याशिवाय, राम कदम यांच्याकडून आयोजित करण्यात येणारा रक्षाबंधन सोहळाही चर्चेचा विषय ठरत आला आहे. राम कदम यांना राखी बांधण्याचा उत्सव दोन-तीन दिवस चालतो. त्यानंतर राम कदम यांच्याकडून लाडक्या बहिणींना साडीवाटप केले जाते. यासाठी महिला मोठ्या संख्येने गर्दी करतात. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन भाजप नेतृत्त्वाने अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर असूनही राम कदम यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला, असे म्हणावे लागेल.
लोकसभेला राम कदमांच्याच मतदारसंघातून भाजपला फटका
दरम्यान लोकसभा निवडणुकांमध्ये ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा हे भाजपकडून रिंगणात होते. पण भाजपच्या या उमेदवाराला राम कदम यांच्याच मतदारसंघात फटका बसला. राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून मिहिर कोटेचा यांना 63 हजार 3370 मतं मिळाली होती. त्याचप्रमाणे याच मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना 79 हजार 142 मत मिळाली. त्यामुळे राम कदम यांच्या विधानसभेच्या तिकीटावरही मागच्या काळात प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं पाहायला मिळालं.
राम कदम पुन्हा एकदा रिंगणात
पण आता हे चित्र स्पष्ट झालं असून राम कदमच घाटकोपर पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत. राम कदम हे पहिल्यांदा 2009 साली राज ठाकरे यांच्या मनसेकडून निवडणूक लढवून विधानसभेवर आमदार म्हणून गेले होते. त्यांनंतर त्यांनी 2014 मध्ये भाजपचं कमळ हाती घेतलं. 2014 आणि 2019 मध्ये राम कदम अगदी सहजपणे निवडून आले होते. पण 2024 ची निवडणूक ही राम कदमांसाठी फारशी सोप्पी नसल्याचा अंदाज लोकसभेच्या निकालावरुन वर्तवला जातोय. आता हा अंदाज खरा ठरणार की राम कदम त्यांचा किल्ला राखण्यात यशस्वी होणार याची उत्सुकता आहे.
ही बातमी वाचा :
मुंबईत मविआचा अनपेक्षित डाव? वर्सोवा किंवा गोरेगाव विधानसभा मतदारसंघात हा उमेदवार रिंगणात उतरवणार?