मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून आजच उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी राज्यसभेचे उमेदवार जाहीर करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाजीराजेंना दिलेली पक्षप्रवेशाची मुदत आज संपल्याने शिवसेना आपले दोन्ही उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस असल्याचं दिसून येतंय. राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार असल्याचं पक्षाकडून आधीच जाहीर करण्यात आलं आहे. त्यासाठी संभाजीराजे छत्रपतींना पक्षप्रवेशाचे निमंत्रण देण्यात आलं होतं. पण संभाजीराजेंनी पक्ष प्रवेशाला नकार दिल्याने शिवसेना आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागातील शिवसैनिकाला राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी रविवारी संभाजीराजेंची भेट घेतली होती आणि आज 12 वाजेपर्यंत त्यांनी पक्षप्रवेश करावा अशी विनंती केली होती. संभाजीराजेंना दिलेली ही मुदत आता संपली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एका ज्येष्ठ नेत्याला ही जागा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आजच संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याकडून या जागेसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, संभाजीराजेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. संभाजीराजे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती आहे.
अपक्षाला पाठिंबा देणार नाही, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींनी 42 मतांची तजवीज केली का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. शिवसेना दोन जागा लढवणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमचा संभाजीराजेंना विरोध नसल्याचेही राऊत म्हणाले. मला बाकी काही माहिती नाही पण शिवसेनेच्या दोन जागा निवडून येणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेनेचे दोन उमेदवार राज्यसभेत जाणार असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.