Rajya Sabha Election 2022 Mumbai News: राज्यसभेची निवडणूक संभाजीराजे लढणार की त्यातून माघार घेणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. संभाजीराजे छत्रपती शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता संभाजीराजे छत्रपती यांची मुंबईतील (Mumbai) मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेला राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 


संभाजीराजे छत्रपतींनी आपण राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांनी सहाव्या जागेसाठी शिवसनेनेने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेनेने त्यांना उमेदवारी देतो पण पक्षप्रवेश करावा अशी अट टाकल्याची माहिती होती. 


शिवसेनेची संजय पवार ( Sanjay Pawar) यांना उमेदवारी
संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी Rajya Sabha Election 2022) आपला सहावा उमेदवार जाहीर केला. कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली. आज दुपारी संजय पवार आणि संजय राऊत या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. भाजपने त्यांची तिसरी जागा लढवली तरी शिवसेनेचा उमेदवारच निवडून येणार असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. 


संभाजीराजे (Sambhajiraje) उद्या भूमिका जाहीर करणार 
या सर्व घडामोडींनंतर संभाजीराजेंनी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करुन आपली भूमिका जाहीर करु असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून संभाजीराजे विविध लोकांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. आता संभाजीराजे छत्रपती नेमकी काय भूमिका घेणार, ते निवडणूक लढणार की माघार घेणार हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. 


मनसेचा (MNS) संभाजीराजेंना (Sambhajiraje) पाठिंबा
छत्रपती संभाजीराजेंना मनसेने पाठिंबा दिला आहे. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी यामध्ये राजकारण आणायचं नसल्याचं सांगितलं. आमदार राजू पाटील म्हणाले की, "संभाजीराजेंची चांगल्या भावनेने भेट घेतली असून त्यांना मतदान करणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. इतके दिवस पक्षात या तर मत देवू, हे जे काही सुरू आहे ते चुकीचं आहे, सर्वांनी मतदान करून राजेंना पाठिंबा दिला पाहिजे."