मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळतेय. या निवडणुकीत एक-एक मताला किंमत आली असून ती आपल्याकडे यावीत यासाठी दोन्हीकडून प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन विकास आघाडीच्या हिंतेंद्र ठाकुर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. 


हितेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे तीन मतं आहेत. ही मतं आता निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपकडून ठाकुर यांची मनधरणी सुरू आहे. आज महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हितेंद्र ठाकुर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यानी दिली आहे. या दोन नेत्यांमध्ये दोन मिनीटांची चर्चा झाली असून ती सकारात्मक झाल्याची माहिती आहे. 


वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, बोईसरचे आमदार राजेश पाटील असे तीन आमदार बहुजन विकास आघाडीकडे आहेत. बविआने महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी सुरुवातीला पाठिंबा दिला होता. वसई विरार क्षेत्रात बविआचं प्रभूत्व आहे. या भागात शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे आतापर्यंत बविआला शिवसेना ठक्कर देत आली आहे.  


दरम्यान, पक्षाच्या पाठिंब्याबाबत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर दोन्ही आमदारांसोबत बसून चर्चा करणार असल्याचं हितेंद्र ठाकुर यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. भाजप आणि शिवसेनेकडून ही तीन मतं आपल्यालाच मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 


आपले वडापावचे वांदे:आमदार ठाकूर
महाविकास आघाडीने आपले आमदार ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार हितेंद्र ठाकूर म्हणाले, "आपणाला फाईव्ह स्टार हॅाटेलमध्ये राहणं परवडणार नाही, आणि आपणाला कोणत्याही पक्षाकडून आमंत्रण ही नाही. खिशात साध्या पाचशे पाचशेच्या दोन नोटा आहेत. आपले साधे वडापावचे वांदे आहेत. आम्हाला परवडते घरच्या घरी, आमच्या सौभाग्यवती चांगल जेवण बनवतात, त्यामुळे आमची तब्येत बरी आहे असा उपरोधात्मक टोला ठाकूर यांनी लगावला आहे."