स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये ठाकरे गटातील दोन माजी आमदारांनी प्रवेश केल्याने संघटनेची ताकद वाढली अशी चर्चा होत असतानाच डझनभर पदाधिकाऱ्यांनी संघटनेला सोडचिट्टी दिल्याने पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्यासमोर आव्हान ठाकलं आहे. संघटनेमधील बेबनाव सुद्धा समोर येत आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक यांच्यासह डझनभर पदाधिकाऱ्यांनी स्वाभिमानला सोडचिट्टी दिल्याने मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, इतक्या उलथापालथी होऊन सुद्धा संघटनेचा बिल्ला लावून चार ते चार ते पाच आमदार विधानसभेत जातील, असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
शेतकरी चळवळीमध्ये अजूनही धग आहे ती पेटवण्याचा मी प्रयत्न करत आहे
पदाधिकाऱ्यांच्या सोडचिट्टी दिल्यानंतर शेट्टी यांनी आज एबीपी माझाशी संवाद साधला. राजू शेट्टी म्हणाले की, ज्यांना जायचं होतं त्यांनी केवळ तिसऱ्या आघाडीचे कारण दिलं आहे. 20-22 वर्षांपूर्वी माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला त्यावेळी मला शेतकऱ्यांनी वेळेवर रुग्णालयात नेल्याने जीवदान मिळालं. मी इथून पुढील आयुष्य शेतकऱ्यांसाठी काम करायचं ठरवलं आहे. त्यामुळे कारखानदारांना विरोध करत आलो असल्याचे सांगितले. शेतकरी चळवळीमध्ये अजूनही धग आहे ती पेटवण्याचा मी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. जे माझ्या अवतीभवती टोळकं होतं ते निघून गेले आहे, आता कार्यकर्ते माझ्याशी खुलेपणाने चर्चा करतील असेही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना आमिष दाखवले जातात
शेट्टी यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये 200 ते 250 राजकीय घराणी निर्माण झाली आहेत. या प्रस्थापित घराण्यांविरोधात आम्ही उभे राहिलो आहोत. जोपर्यंत तुम्ही चळवळीत आहात तोपर्यंत कार्यकर्ते तुम्हाला पाठिंबा देत असतात. चळवळीपासून दूर गेला की तुम्ही एकटेच दूर जातात. कार्यकर्ते चळवळीसोबत राहतात. जे चळवळला सोडून गेले त्यांच्याभोवती गर्दी होती ती गर्दी केवळ चळवळीची होती. त्यामुळे ते जाताना एकटेच गेले आहेत. चळवळीत दररोज नवीन नवीन चेहरे येत असतात. चळवळ कधीही संपत नसल्याचे ते म्हणाले. समजा उद्या मी काम थांबवलं तरी चळवळ पुढे चालू राहील, पण निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना आमिष दाखवले जातात. चळवळीमध्ये राहुन नावारूपाला आलेलं आयतं प्रॉडक्ट राजकीय पक्षांना मिळत असतं. जे सोडून गेले त्यांना अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी म्हटलं की आता आम्हाला आमचं पहावं लागेल, त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या. इतक्या उलथापालथी होऊन सुध्दा संघटनेचा बिल्ला लावून 4 ते 5 आमदार विधानसभेत जातील