नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस (TMC) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत टीएमसी 209 जागांवर आघाडीवर होती. राज्यात भाजपला 80 जागा मिळताना दिसत आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी यांचे बहुमत मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. आतापर्यंत शरद पवार, अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव आणि अखिलेश यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सर्व देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्रामची जागा ममतांनी जिंकली आहे.



राजनाथ सिंह यांचे ट्विट
राजनाथ सिंह यांनी ट्वीट केले की, 'पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी यांचे विधानसभा निवडणुका जिंकल्याबद्दल अभिनंदन. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा.






बंगालमधील ममतांची जादू
भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व मंत्र्यांनी राज्यात जोरदार प्रचार केला होता, तरीही बंगाल निवडणुकीत ममतांची जादू अखंड राहिली. निवडणुकीपूर्वी टीएमसीचे सर्व नेते पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र, टीएमसीला त्याचा फारसा फरक पडला नाही.


डाव्या आणि इतर पक्षांचे प्रचंड नुकसान
यावेळी बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसी आणि भाजप यांच्यात थेट स्पर्धा दिसून येत आहे. डाव्या, काँग्रेस व अन्य पक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही निवडणुकांपर्यंत टीएमसीला कडवी झुंज देणारे डावे यावेळी केवळ एका जागेवर येताना दिसत आहेत.


ममता बॅनर्जीं कोर्टात जाणार
देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. मात्र आधी ममता बॅनर्जी यांचा विजय झाला असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. यासंदर्भात एएनआयनं ट्वीट केलं आहे. दरम्यान नंदीग्रामध्ये फेर मतमोजणीची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.