मुंबई : राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीतील प्रचार सभांचा खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. राज ठाकरे निवडणूक लढत नसताना कुणासाठी प्रचारसभा घेत आहेत? या प्रचारसभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा? अशी विचारणा भाजपने पत्र लिहून निवडणूक आयोगाकडे केली होती.
भाजपच्या या पत्राची दखल घेत निवडणूक आयोगाने राज ठाकरेंच्या सभाच्या खर्चाचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंना आता सभांचा खर्च निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. मात्र राज ठाकरे हा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
राज ठाकरेंचा प्रचार पूर्णपणे राजकीय आहे. त्यामुळे ते जेथे सभा घेतील त्या ठिकाणच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवारांच्या निवडणूक खर्चात हा खर्च दाखविणे गरजेचे आहे, असं भाजपने आपल्या पत्रात म्हटलं होतं.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या प्रचारसभांची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. प्रत्येक सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाहांवर निशाणा साधाला होता. तसेच भाजपला मतदान करु नका असं आवाहनही केलं होतं. आता निवडणूक आयोगाकडे आदेशानंतर राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.