Raj Thackeray Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढणार आहे. अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे माहीम विधानसभेतून उमेदवार देणार नाहीत, अशी चर्चा रंगली होती. तसेच आदित्य ठाकरेंनी 2019 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यावेळी राज ठाकरेंनी वरळीतून मनसेचा उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे उद्वव ठाकरे देखील अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार नाहीत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर होताच उद्धव ठाकरेंनी देखील माहीम विधानसभेतून महेश सावंत यांना उमेदवारी दिली. अमित ठाकरेंच्या या उमेदवारीवरुन आता राज ठाकरेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
आज एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर करण्यापासून पाठिंबाबाबत आपली भूमिका मांडली आहे. राज ठाकरे म्हणाले की, आमच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, अमित म्हणाला, पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावं, मी सुद्धा लढेन...मी अमितला म्हणालो, तू सिरियस आहेस, तो म्हणाला पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावे , मी सुद्धा लढेन, असं अमित म्हणाला. मी बाळासाहेबांच्या विचाराने वाढलो. अमितने ठरवले आहे, आज उभा केलं नाही, तर उद्या निवडणुकीत उभा करावाचं लागेल, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच अमितप्रमाणे अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह इतर उमेदवार देखील माझ्यासाठी समान आहे, त्यांच्यासाठी देखील मी प्रयत्न करणार, असं राज ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंसाठी कुणाचाही मला फोन नव्हता, तो माझा निर्णय होता- राज ठाकरे
आदित्य ठाकरेंसाठी मी विचार केला. विरोधातील पक्ष असला तरी मी राजकारण आणि नातेसंबंध जपत असतो. मी त्या विचारात वाढलोय. मला त्यावेळी वाटलं 38-39 हजार मतं असून मला वाटलं आदित्य ठाकरे निवडणूक लढतोय, म्हणून आपण उमेदवार नको देऊया...मला त्याचा पश्चाताप नाही. हा माझा विचार होता. मी विचार करतो, तसा समोरचा करेल अशी अपेक्षा नाही. मी त्यावेळी कोणाशीही फोनवरुन बोललो नव्हतो. हा प्रत्येकाचा स्वभावाचा भाग झाला. प्रत्येकजण आपल्या स्वभावानूसार वागत असतो. भाजपला ही गोष्ट कळू शकते, सगळ्यांनाच हे कळेल असं नाही. प्रत्येकाचे ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु असतात. आपण कुठे आणि किती सांगायला जायचं?, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरेंकडून प्रेरणा मिळाली- राज ठाकरे
राजकारणाशी कौटुंबिक संबंध ठेवण्याची प्रेरणा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाली. ते प्रत्येकामध्ये असलं पाहिजं. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे पहिल्यांदा निवडणूक लढवत होत्या, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांच्यासाठी मतं दिली होती. मुलगी पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून खासदार म्हणून सभागृहात यावी, असं ते म्हणाले होते. त्या बदल्यात बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांकडे काहीही मागितलं नाही. प्रतिभा पाटील पहिल्यांदा राष्ट्रपती होत असताना त्या काँग्रेसच्या उमेदवार असूनही बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता. राजकारणात काहीतरी चांगुलपणा असायला हवा, असं राज ठाकरेंनी सांगितले.