Raj Thackeray On Uddhav Thackeray मुंबई: मी मशि‍दींवरील भोंगे उतरवले. भोंगे उतरवले नाहीतर आम्ही हनुमान चालिसा लावणार होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरेंच्या सरकारने आमच्या 17 हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी स्वत: मशिदींवरी भोंगे उतरवा असं म्हटलं होतं. बाळासाहेबांनंतर ते राज ठाकरेंनी केलं. मग यामध्ये उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?, असा हल्लाबोल मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. शिवडी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी आज दुपारी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर शिवडी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने बाळा नांदगावकर यांना जाहीर पाठिंबा दिल्याबाबत राज ठाकरेंनी आभार देखील मानले. 


3 सूनांचं उदाहरण देत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला-


एका बाईला तीन मुलं असतात. पहिल्या मुलाचं लग्न होतं. त्यावेळी सासू आणि सुनेचं भांडण होतं आणि मुलगा ते घर सोडून जातो. सगळे बोलतात नवीन सून आल्यानंतर भांडण झाली. भांडखोर सून होती म्हणून सासूसोबत भांडून घर सोडून गेली. त्यानंतर दुसऱ्या मुलाचं लग्न होतं. दुसरी सून घरी येते. यावेळी दुसऱ्या सुनेचं देखील सासूसोबत भांडण होतं. तेही घर सोडून जातात. तिसरी सून येते, तो मुलगा देखील बायकोसोबत घर सोडून जातो. त्यानंतर लोकांना कळतं की तीन सुना होत्या, त्यांच्यात प्रॉब्लेम नव्हता, तर सासूमध्ये प्रॉब्लेम आहे. ती सासू म्हणजे उद्धव ठाकरे, अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली. 


शिवसेनेची सासू बसलीय, तिच्यातच प्रॉब्लेम-


शिवसेनेची सासू बसली आहे ना, तिचा प्रॉब्लम आहे. जी मुले सोडून गेली त्यांचा नाही. या लोकांनी तुमचा अपमान केला आहे. महाराष्ट्रात 2019 पासून जे घडले ते विसरू नका. या सगळ्याला कारण फक्त एक माणूस तो म्हणजे उद्धव ठाकरे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. सोडून गेलेले गद्दार नाही, तर खरा गद्दार उद्धव ठाकरे  आहे.  उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले, उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्. या माणसाच्या वागणुकीमुळे राणे बाहेर पडले. त्यांनंतर मी बाहेर पडलो आणि आता शिंदे, असं राज ठाकरेंनी सांगितले. गेल्या 5 वर्षात काय केले या सगळ्याची उजळणी करा..सर्व आठवा आणि  मग 20 तारखेला बाळा नांदगावकरांना मतदान करा...मनसेचे राज्यातील जे उमेदवार आहेत. त्यांना निवडून द्या..., असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. 




संबंधित बातमी:


Raj Thackeray: राज ठाकरेंनी शेवटच्या प्रचारसभेत भाजप अन् शिवसेना शिंदे गटाचे मानले आभार; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल