Raj Thackeray On Uddhav Thackeray: सोडून गेलेले गद्दार नाही, तर खरा गद्दार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहे, असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली. अनेकजण पक्ष सोडून गेले, त्यांना ते गद्दार बोलताय. खरा गद्दार तर घरात बसलाय, तुम्ही पक्षासोबत गद्दारी केली, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. शिवडीत बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले. या माणसाच्या वागणुकीमुळे राणे बाहेर पडले, त्यांनंतर मी बाहेर पडलो आणि आता शिंदे, असं राज ठाकरेंनी सांगितले. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना त्रास दिला, त्यांना उद्धव ठाकरेंनी घरी जेवायला बोलावलं, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली. उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.
बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेलेल्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये- अजय चौधरी
राज ठाकरेंच्या या टीकेला शिवडीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अजय चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करायची?, अनेकांच्या सुपार्या घेऊन राज ठाकरे काम करतात. गद्दार कोण आहे, पक्ष कोणी सोडला, बाळासाहेबांना कोणी सोडलं? उभ्या महाराष्ट्र जनतेला माहिती आहे, अशी टीका अजय चौधरी यांनी केली. राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेला आम्ही कवडीची किंमत देत नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंसोबत होतो, आहोत...जन्म बाळासाहेब ठाकरेंसोबत राहू...बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेलेले यांनी आम्हाला अक्कल शिकू नये, असं प्रत्युत्तर अजय चौधरींनी दिलं आहे.
राज ठाकरेंच्या टीकेवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया-
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना गद्दार म्हटल्यानंतर शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाऊच भावाला बोलतोय, याचा अर्थ त्यात काहीतरी तथ्य आहे. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना घेऊन पुढे चाललो आहोत. आम्ही कुठल्याच पक्षात प्रवेश केला नाही. मूळ शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आमचं आम्हाला मिळालं. राज ठाकरे बोलले ते अगदी योग्य आहे. आम्ही केलेलं योग्य आहे. आमच्यावर जे शिंतोडे उडवत आहेत, त्यांना घरचा आहेर राज ठाकरे यांनी दिला आहे, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.