मुंबई : "संघर्ष हा तुमच्या राजकरणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत तुम्ही संघर्षाची परिसीमा गाठत हे नेत्रदीपक यश मिळवलं," अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. पश्चिम बंगालच्या मतमोजणीच्या कलांवरून त्या राज्यात ममता बॅनर्जींची लाट कायम असल्याचं स्पष्ट झालंय. तृणमूलने दोनशेंच्या वर जागांवर आघाडी घेतली असून बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता राज येण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे म्हणाले, पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जींच अत्यंत मनापासून अभिनंदन. कलासत्ताक वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूपच समानता आहे, आणि त्यामुळे राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता ह्यांच महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्ततेसाठीचा आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसमावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा मी व्यक्त करतो."
एम. के. स्टॅलिन यांचा द्रविड मुनेत्र कळघम आघाडीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्टॅलिन यांचे देखील अभिनंदन केले आहे.
"तामिळनाडू विधानसभेत स्टॅलिन यांच्या नेतृत्त्वाखाली डीएमके पक्षाने मिळवलेल्या विजयासाठी, स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिले. हीच भूमिका तुम्ही देखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल आणि काही बाबतीत राज्यांच्या स्वायत्ततेबद्दल आग्रही राहाल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन", असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.