नागपूर : भाजप सरकारने बड्या लोकांचं 3.5 लाख कोटींचं कर्ज माफ केलं आहे. मग शेतकऱ्यांचं कर्ज का माफ नाही केलं? असा सवाल करत आम्ही शेतकऱ्यांवरील सर्व कर्ज माफ करणार करणार असल्याचे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपुरात दिले.


नागपूरमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेस काम करतं, भाजप केवळ आश्वासन देतं, असा टोलाही लगावला. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान न होऊ देता गरीबांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तज्ज्ञांशी चर्चा करुनच 72 हजारांचे आश्वासन दिले असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

बड्या लोकांचं 3.5 लाख कोटींचं कर्ज माफ केलं, शेतकऱ्यांचं कर्ज का माफ नाही केलं असे म्हणत आमची सत्ता आल्यावर आम्ही ते माफ करणार असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये केलेल्या कर्जमाफीचे उदाहरण देखील दिले.

यावेळी ते म्हणाले की, गरीबांना  द्यायला आणि कर्जमाफीसाठी पैसे कुठून येणार? असा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी विचारतात. मात्र जेव्हा पतंजलीला नागपुरात जमीन दिली, अंबानीला पैसे दिले तेव्हा कसे पैसे येतात, असा पलटवार त्यांनी केला.

देशात 12 हजारपेक्षा कमी उत्पन्नाचा एकही माणूस नाही राहिला पाहिजे.  गरीबीवर काँग्रेसचा हा सर्जिकल स्ट्राईक आहे, असेही ते म्हणाले. अनिल अंबानींवर ४५ हजार करोड रुपयांचे कर्ज आहे. ते जेलमध्ये चालले होते, त्यांच्या भावाने पैसे देऊन त्यांना वाचवलं. त्या अंबानींना हे सरकार अनुभव नसताना विमान बनवायचं कंत्राट देतं, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.