Pune ZP Election 2026: राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; पुण्याच्या आंबेठाण पाईट परिसरातील घटना, राजकीय वर्तुळात खळबळ
Pune ZP Election 2026: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे (Sunita Butte) यांच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Pune ZP Election 2026: राज्यभरात आज (7 फेब्रुवारी) जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मतदानाची (ZP and Panchayat Samiti Elections 2026) रणधुमाळी पार पडत आहे. अशातच पुण्याच्या (Pune) खेड तालुक्यातील आंबेठाण पाईट येथे जिल्हा परिषद गटात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे (Sunita Butte) यांच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शरद बुट्टे पाटील यांनी काही दिवसापूर्वीच भाजपातून (BJP) अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी (Ajit Pawar Ncp) काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या हल्ल्यात माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी गटनेते शरद बुट्टे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी वासुली फाटा येथील बालाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
Pune ZP Election 2026: दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांकडून अचानक हल्ला, शरद बुट्टे गंभीर जखमी
दरम्यान, शरद बुट्टे हे आपल्या खासगी कामानिमित्त बाहेर गेले असता दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जात असून, हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडालीय. दरम्यान, नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले आहे. शरद बुट्टे यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी डॉक्टरांचे पथक सतत लक्ष ठेवून आहे.
Pune Politics : परिसरात तणावपूर्ण वातावरण,राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया
दरम्यान, या घटनेनंतर आंबेठाण पाईट परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
दुसरीकडे, जुन्या वादातून किंवा राजकीय कारणातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद निवडणूक काळात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हे देखील वाचा




















