Pune Mahanagarpalika Election 2026 Pooja More: सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगमुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीतून (Pune Mahanagarpalika Election 2026) माघार घ्यावी लागलेल्या भाजप नेत्या पूजा मोरे (Pooja More) यांच्या कुटुंबीयांचा भावनिक उद्रेक एबीपी माझाशी बोलताना पाहायला मिळाला. मुलीची मानसिक अवस्था पाहून आई-वडिलांना अश्रू अनावर झाले, तर एक वडील म्हणून लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
पुण्यातील प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पूजा मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी अखेर निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर सातत्याने होणाऱ्या वैयक्तिक, खालच्या पातळीवरील टीकेमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
Pooja More: ट्रोलिंगमुळे माघार, पूजा मोरे भावूक
पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजप कार्यकर्त्यांकडून पूजा मोरे यांना प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले. या सततच्या मानसिक तणावानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे यांचे डोळे पाणावले. निवडणूक लढवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने त्या भावूक झाल्या.
Pooja More: “माझ्या मुलीला खूप ट्रोल केलं”, आई-वडिलांचा आक्रोश
पूजा मोरे यांच्या आई-वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना आपली वेदना व्यक्त केली. “माझ्या मुलीला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. कमी वयात एक मुलगी इतकी पुढे जाते, हे काही लोकांना सहन झालं नाही. लहानपणापासूनचा तिचा संघर्ष आणि प्रवास आमच्या डोळ्यांसमोर आहे. भाजपने तिला तिकीट दिलं आणि तेच काही लोकांना खपलं नाही,” असं भावूक होत त्यांनी सांगितलं.
Pooja More: मुख्यमंत्र्यांनी ट्रोलर्सवर कारवाई करावी
पूजा मोरे यांच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोलर्सवर कारवाई करण्याची मागणी केली. “माझ्या मुलीने समाजासाठी झोकून दिलं. काश्मीरमध्ये जाऊन मदतकार्य केलं. तिने मुख्यमंत्र्यांविरोधात वैयक्तिक काहीही बोललेलं नाही. आमची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मुख्यमंत्र्यांनी ट्रॉलर्सवर कारवाई करावी,” असं त्यांनी म्हटले.
Pooja More: “माघार घेतली तरी राजकारण संपलेलं नाही”
“एक वडील म्हणून मी माझ्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. माझे जावई देखील तिच्या राजकीय करिअरसाठी तिच्या पाठीशी उभे आहेत," असे देखील त्यांनी सांगितले. पूजा मोरे यांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी त्या पक्षाच्या इतर उमेदवारांसाठी काम करतील, असा विश्वास त्यांच्या वडिलांनी व्यक्त केला. “माझ्या मुलीवर अन्याय झाला आहे. पण पक्ष तिला भविष्यात योग्य संधी देईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे देखील पूजा मोरेंच्या वडिलांनी म्हटले आहे.
आणखी वाचा