लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तर प्रदेशमधील वाराणसी या मतदार संघात महाआघाडीने अद्याप उमेदवार दिलेला नाही. काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी या पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी असून त्या सध्या या भागात काँग्रेसचा जोरदार प्रचार करत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी या वाराणसीत नरेंद्र मोदींविरोधात योग्य उमेदवार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.


मोदींना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून एका तगड्या उमेदवाराचा शोध सुरु आहे. वाराणसी हा मतदार संघ पूर्व उत्तर प्रदेशमध्ये येतो. दरम्यान, प्रियांका यांनी पूर्वांचल भागात 'गंगा यात्रा' काढून प्रचाराची सुरुवात केली होती. या यात्रेला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला होता. तसेच मोदींच्या मतदार संघातही प्रियांका यांनी सभा घेऊन काँग्रेसची ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे वाराणसीतून प्रियांका गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेसमध्ये जोर धरत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांनी वाराणसीतीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी "मी वाराणसीतून निवडणूक लढवू का?" असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला, त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी एका सुरात होकार दिला होता.

महाआघाडीत झालेल्या जागा वाटपानुसार वाराणसीची जागा समाजवादी पक्षाला देण्यात आली असून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. परंतु या मतदार संघातून काँग्रेसने उमेदवार उभा करावा अशी मागणी पक्षातीतल नेत्यांनी केली आहे.