Presidential Election 2022: देशात 18 जुलै रोजी नवा राष्ट्रपती निवडला जाणार आहे. ज्या पक्षाची केंद्रात सत्ता, त्याच पक्षाचा राष्ट्रपती असं आतापर्यंतचं गणित आहे. विरोधकांचा उमेदवार हा निवडणुकीमध्ये नावालाच उभा राहतो, बाकी जिंकतो तो सत्ताधारी पक्षाने दिलेला उमेदवार. पण 70 वर्षांच्या या काळात एक निवडणूक अशी झाली की त्यामध्ये सत्ताधारी पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा पराभव करून विरोधी अपक्ष उमेदवार जिंकला होता. निलम संजीव रेड्डी असं त्यांचं नाव असून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याची किमया केली होती. त्यावेळी व्ही व्ही गिरी म्हणून देशाची चौथे राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
ही गोष्ट आहे सन 1969 या सालची. त्यावेळचे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचे निधन झाल्यानंतर नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी देशात इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार होतं. इंदिरा गांधी यांनी तीन वर्षांपूर्वीच पंतप्रधानपद हाती घेतलं होतं. पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करत एका शक्तीशाली नेत्याच्या रुपात त्यांचा उदय होत होता.
सन 1969 साली ज्यावेळी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली त्यावेळी व्ही व्ही गिरी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन मतभेद होता. इंदिरा गांधींचे एक मत होतं तर काँग्रेसच्या संसदीय समितीचं दुसरंच मत होतं. शेवटी इंदिरा गांधींचा विरोध करुन काँग्रेसच्या संसदीय मंडळाने निलम संजीव रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली. पण यामुळे इंदिरा गांधी नाराज झाल्या.
व्हिप जारी करण्यास नकार
निलम संजीव रेड्डी यांना इंदिरा गांधी यांचा विरोध होता. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी दुसरीच खेळी खेळली. त्यांनी 1952 सालच्या प्रेसिडेन्शिअल अॅन्ड व्हाईस प्रेसिडेन्शिअल अॅक्टचा दाखला देत निलम रेड्डी यांच्या बाजूने पक्षाचा व्हिप जारी करण्यास नकार दिला. त्याचा परिणाम हा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर झाला.
त्यावेळी देशामध्ये काँग्रेसचे वर्चस्व होतं. देशातील त्यावेळच्या 17 राज्यांपैकी 11 राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होतं. तसेच संसदेमध्येही काँग्रेसचे बहुमत होतं. काँग्रेसचे निलम संजिव रेड्डी हे सहज निवडून येतील असं चित्र होतं. पण त्याच वेळी इंदिरा गांधींच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. तुम्ही तुमच्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरुन मतदान करा असं आवाहन इंदिरा गांधी यांनी मतदार असलेल्या सर्व आमदार आणि खासदारांना केलं.
इंदिरा गांधींच्या या आवाहनामागचा हेतू त्यांच्या सर्व समर्थकांनी जाणला होता. त्यामुळे काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता व्ही व्ही गिरी या अपक्ष उमेदवाराला मतदान केलं. जवळपास 163 खासदारांनी त्यांना मतदान केलं, तसेच देशभरातील विविध लहान-सहान पक्षाच्या आमदारांनीही व्ही व्ही गिरी यांना मतदान केलं. परिणामी या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेल्या निलम संजीव रेड्डी यांचा पराभव झाला आणि अपक्ष असलेल्या व्ही व्ही गिरी यांचा विजय झाला.
आतापर्यंतच्या इतिहासातील ही एकमेव निवडणूक आहे ज्यामध्ये अपक्ष उमेदवाराची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. या निवडणुकीमुळे इंदिरा गांधी यांचे काँग्रेस पक्षावरील वर्चस्व बळकट झालं.
या निवडणुकीतील एकूण मतं- 8,36,337
जिंकण्यासाठी आवश्यक मतं- 4,18,169
व्ही व्ही गिरी यांना मिळालेली मतं- 4,01,515
निलम संजीव रेड्डी यांना मिळालेली मतं- 3,13,548
दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेली मतं
व्ही व्ही गिरी यांना मिळालेली मतं- 4,20,077
निलम संजीव रेड्डी यांना मिळालेली मतं- 4,05,427