Praniti Shinde : सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसने ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार प्रणिती शिंदे आणि माजी  मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सडकून टीका केली आहे. 


प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम


शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम असल्याचा आरोप केला आहे. कोळी यांनी सांगितले की, त्यांनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. प्रणिती शिंदे या भाजपचा प्रचार करतात आणि त्यांची भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. मात्र, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही, असा इशारा शरद कोळी यांनी दिला.



शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला


कोळी यांनी शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार हा अमर पाटील असून त्यांनाच निवडून आणायचे आहे. त्यांनी सांगितले की, सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही. शिंदे कुटुंबाने आमचे आभार मानणे ऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ही माणसं धोकेबाज निघाली, गद्दाराकडून काय अपेक्षा करणार? असा हल्लाबोल त्यांनी केला. 


उमेदवारीसाठी शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली


सुशीलकुमार शिंदे म्हणाले आम्ही याठिकाणी काडादींना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. या मतदारसंघात चांगलं वातावरण आहे. ते चांगले, शांत आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारे आहेत. या मतदारसंघातून मानेंना उमेदवारी दिली होती, पण अर्ज मिळाला नाही, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. उमेदवारीसाठी शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली. देवकाते मी दोनवेळा निवडून आलो आहे, हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. एकवेळा त्यांचा उमेदवार निवडून आला आहे.  खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, या मतदारसंघाने मुख्यमंत्री निवडून दिला आहे. आघाडी धर्म आम्ही पाळला असून आम्ही एबी फाॅर्म दिलेला नाही. या जागेवरून काही गैरसमज झाले होते, चुकून गेलं असेल असं वाटलं, पण आम्ही काडादींच्या मागे आहोत. जो जिता वही सिकंदर होणार असून आम्ही पक्षाकडून एबी फाॅर्म दिला नाही, आघाडी धर्म पाळला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या