मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार देशभरात 7 टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. परंतु, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घ्यायला याठिकाणी बर्फ पडतो की दळणवळणाच्या समस्या आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात इलेक्शन मी 1984 पासून लढत आहे. कुठेही दंगा झालेला नाही, दगड मारायला कुठे माणूस मिळत नाही. त्यामुळे दोन टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) पाच टप्प्यात का घ्यावा लागत आहे, याचे स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने द्यावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
महाराष्ट्रात कुठं दळणवळणाची समस्या नाही, कुठं बर्फ पडत नाही. कुठं पाऊस नाही मग पाच टप्पे का?, याचे स्पष्टीकरण देण्यात यावे. निवडणूक आयोग शांत महाराष्ट्र अशांत करायला निघाला आहे का? आमचं म्हणणं आहे की, लोकसभा निवडणूक दोन टप्प्यात झाली पाहिजे. पहिल्या टप्प्यात राज्यातील लोकसभेच्या 24 आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 24 जागांची निवडणूक घ्यावी. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला पत्र पाठवू, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
महाविकास आघाडीसोबतच्या लोकसभा जागावाटपाचं काय?
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आणि महाविकास आघाडीत सुरु असलेल्या जागावाटपासंदर्भातही भाष्य केले. लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी करण्यासाठी आम्ही समिती नेमली आहे. त्यामुळे मला याबाबत माहिती नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तसेच राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचे निमंत्रण मला मिळाले आहे. ते निमंत्रण स्वीकारल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान
पहिला टप्पा : मतदान- 19 एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)
दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ - 8)
तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ - 11 )
चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ - 11 )
पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ - 13 )
आणखी वाचा
लोकसभा निवडणूक 2024 , मतदान कधी, निकाल कधी, सर्व माहिती एकाच ठिकाणी!