पंढरपूर : सरकार हे डोक्याने चालवायचे असते, मात्र मोदी हे गुडघ्यांनी सरकार चालवत असल्याचा घणाघात आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. सोलापूर लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात आज आंबेडकर यांनी मंगळवेढा येथून केली. यावेळी अनुसूचित जाती-जमातीतील आणि मुस्लीम समाजातील बांधव मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या सभेला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहून काँग्रेस-आघाडी आणि भाजप गोटात अस्वस्थता पसरली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सगळे जग थांबण्यासाठी सांगत असताना कर्जबाजारी पाकिस्तानवर मोदी सरकारने 14 दिवसांनी हल्ला चढवला. एकदम हल्ला केला पण निदान एखादा तरी मारायचा होता, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी एअर स्ट्राईकच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर हल्ला चढवला.
पुलवामानंतर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामुळे कर्जबाजारी पाकिस्तानच्या मदतीला चीन धावला आणि त्याने पाकिस्तानला 2 लाख कोटी रुपयाची मदत केली. पाकिस्तान कर्ज फेडण्याच्या मागे लागला असताना मोदींच्या चुकीमुळे पाकिस्तानला मदत झाल्याचा टोला आंबेडकरांनी लगावला.
नोटबंदीच्या काळात केलेल्या घोटाळ्यातून आलेले 40 टक्के कमिशनची रक्कम आता निवडणुकात खर्च केली जाणार असून पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचे स्वप्न मोदी-शाह जोडी बघत असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं.
सध्या आलेल्या सर्वेमध्ये वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळाल नसल्याचं दाखवलं आहे. तरीही मला भेटलेल्या युतीच्या 18 उमेदवारांनी आपली लढत वंचित बहुजन आघाडीशी असल्याचे म्हटल्याचं आंबेडकरांनी सांगितले. समाजातील अनुसूचित जाती-जमात आणि मुस्लीम हे दोन वर्ग भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही मतदान करणार नसून याचा सगळ्यात जास्त फायदा वंचित बहुजन आघाडीला होणार असल्याचा दावाही आंबेडकरांनी केला.