Pradyot Kishore Manikya Debbarma : भारताच्या पूर्वेकडील राज्य त्रिपुरा (Tripura), मेघालय (Meghalaya) आणि नागालँडमधील (Nagaland) विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election 2023) आज (2 मार्च) थोड्याच वेळात हाती येणार आहे. या विधानसभा निवडणुकीत सध्या त्रिपुरा निवडणुकीत राजघराण्याची जोरदार चर्चा आहे. त्रिपुराच्या राजघराण्यातील प्रद्योत किशोर देबबर्मा यांच्याकडे राज्यात किंगमेकर म्हणून पाहिलं जात आहे. देबबर्मा यांचा पक्ष टिपरा मोथाने एक्झिट पोलमध्ये सर्वांनाच चकित केलं आहे. त्यांच्या टिपरा मोथा (TIPRA Motha Party) पक्षानं एक्झिट पोलमध्ये सर्वांनाच चकित केलं आहे. 


एक्झिट पोल काय सांगतात? 


त्रिपुरा विधानसभा निवडणूक 2023 साठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान झालं. त्रिपुरामध्ये डाव्यांना पुन्हा एकदा आपला जुना बालेकिल्ला परत घेण्याची आशा आहे, त्यामुळे काँग्रेससाठी 'करा किंवा मरो' अशी स्थिती आहे. राज्यातील निवडणुकांचे निकाल आज 2 मार्चला जाहीर होतील, मात्र त्याआधी आलेल्या एक्झिट पोलने डाव्या-काँग्रेस आघाडीला मोठा धक्का दिला आहे. यावेळी डाव्या आघाडीच्या हातातून सत्ता निसटताना दिसत आहे. यामागे त्रिपुरा राजघराण्यातील प्रद्योत माणिक्य देबबर्मा आहेत. त्यांच्या टिपरा मोथा पक्षाने या निवडणुकीच नेत्रदीपक कामगिरी केल्याचं एक्झिट पोलवरून पाहायला मिळत आहे.


प्रद्योत किशोर देबबर्मा यांची 'टिपरालँड'ची मागणी


त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा यांच्या टिपरा मोथ पक्षाने 42 उमेदवारांसह निवडणूक लढवली. या निवडणुकीत प्रद्योत माणिक्य देबबर्मा यांनी टिपरा मोथा पक्षाच्या माध्यमातून वेगळाच राज्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. याच कुटुंबाच्या प्रयत्नांमुळे त्रिपुराचे भारतात विलीनीकरण झाले. आता याच कुटुंबातून आलेल्या प्रद्योत माणिक्य देबबर्मा यांनी 'टिप्ररालँड'ची मागणी केली आहे. त्रिपुरातील टिपरा मोथा या आदिवासी भागात देबबर्मा यांचा पक्ष मजबूत मानला जातो. या राजघराण्याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.


कोण आहेत प्रद्योत किशोर माणिक्य देब बर्मा?


राजघराण्यातील प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा हे टिपरा मोथा पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रद्योत माणिक्य देबबर्मा यांचा जन्म 4 जुलै 1978 रोजी त्रिपुराच्या राजघराण्यात झाला. त्यांचे वडील किरीट बिक्रम किशोर देबबर्मा आणि आई बिभू कुमारी देवी. त्यांचे बालपण दिल्लीत गेले. सध्या ते आगरतळा येथे वास्तव्यास राहतात. प्रद्योत देबबर्मा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. 25 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांची निवड त्रिपुरा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. मात्र, ते या पदावर जास्त काळ राहू शकले नाहीत. NRC प्रकरणामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी काही काळ सक्रिय राजकारणातून ब्रेक घेतला.


राजकारणाशी जुनं नातं


देबबर्मा कुटुंबाचे राजकारणाशी जुनं नातं आहे. प्रद्योत देबबर्मा यांचे वडील किरीट बिक्रम यांनी दीर्घकाळ काँग्रेसमधून राजकारणात सक्रिय होते. ते तीन वेळा खासदार होते. त्यांची पत्नी म्हणजेच प्रद्योत माणिक्य यांची आई बिभू कुमारी देवी या देखील दोन वेळा काँग्रेसच्या आमदार आणि त्रिपुरा सरकारमध्ये मंत्री होत्या.


कशी झाली टिप्रा पक्षाची सुरुवात?


5 फेब्रुवारी 2021 रोजी, प्रद्योत माणिक्य यांच्या वडिलांनी TIPRA नावाच्या सामाजिक संस्थेची राजकीय पक्ष म्हणून घोषणा केली. त्यांनी 2021 मध्ये त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषद (TTAADC) निवडणूक लढवण्याची घोषणा केली. या निवडणुकी पक्षाने चमकदार कामगिरी केली आणि 16 जागांसह बहुमत मिळवलं. आता या पक्षाला टिपरा किंवा टिपरा मोथा या नावाने ओळखलं जातं. टिपरा पक्षाची 'ग्रेटर टिप्ररालँड' (Greater Tipraland) करण्याची मागणी आहे. आदिवासी, गैर-आदिवासी आणि त्रिपुरी आदिवासी यांचं एक वेगळे राज्य करण्याची मागणी केली आहे.