पंढरपूर : राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट वाढत असताना पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि उद्या यासाठी मतदान होत आहे. दुर्दैवाने आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक होत असताना राजकीय साठमारीत सर्वच पक्षांना याचा विसर पडला आणि आता सर्व नियम डावलून झालेल्या प्रचारामुळे आता हॉस्पिटल मध्ये बेड मिळत नाहीत असे भयानक चित्र आज तयार झाले आहे.  रोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने मतदारातही घाबरून गेले आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात काट्याची टक्कर होत असून उद्या कोरोनाच्या छायेत कसे मतदान होणार यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे . 


पोटनिवडणुकीत गेले काही दिवस विजय आमचाच म्हणत अजित पवार आणि जयंत पाटील यांनी भल्या मोठ्या सभांचा दणका उठवला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नंतर विजय द्या  राज्यातली सत्ता बदलू असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठं मोठ्या सभा घेतल्याने आता कोरोनाचे पीक जोमदार रीतीने येऊ लागले आहे. वास्तविक देशात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात असताना ही पोटनिवडणूक टाळायचा प्रयत्न होणे अपेक्षित होते. मात्र त्या ऐवजी कोरोनाला पोषक अशा मोठा मोठ्या सभा झाल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती आता वाढू लागली आहे. वास्तविक गेल्यावेळी भाजपकडून निवडणूक लढवले माजी आमदार सुधाकर परिचारक यांचेही कोरोनामुळे निधन झाले होते. मात्र पोटनिवडणुकीत प्रचार अशा रीतीने झाला की यांना ही पोटनिवडणूक का होतीय आणि या निवडणुकीमुळे किती जणांचे या कोरोनामुळे बळी जाऊ शकतील याचा विचारही शिवलेला दिसत नाही.  


 सध्या पंढरपूर परिसरात एकही हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसून क्षमतेपेक्षा दुप्पट कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत . मात्र ही लाट इतकी धोकादायक आहे की निवडणुकीचे अर्ज भरल्यापासून कालपर्यंत या मतदारसंघात तब्बल 15 जणांचा बळी या कोरोनामुळे गेला आहे .  मंगळवेढयात 23 मार्चला अर्ज भरताना 46 रुग्णसंख्या होती ती काळ दसपटीने वाढून 401 पर्यंत गेली आहे. पंढरपूर मध्येही असलेली 217 ही रुग्णसंख्या तब्बल 1105 पर्यंत गेली असून रोज यामध्ये मोठी भर पडू लागली आहे. आता शहरात असणारे सर्व कोरोना केअर सेंटर कधीच फुल झाले असून हॉस्पिटल मध्ये बेड नसल्याने नागरिक अकलूज , सांगोला , सोलापूर अशा ठिकाणी मिळेल त्या किंमतीने बेड मिळविण्यासाठी फिरत आहेत. रेमेडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा इतका भासू लागला असून वाटेल त्या किमतीत ती मिळविण्याचा प्रयत्न नागरिक करू लागले आहेत. तीच अवस्था ऑक्सिजनची झाली असून अनेक हॉस्पिटलला ऑक्सिजन सिलेंडर पुरवताना  प्रशासनाची दमछाक होत आहे. 



  •  पंढरपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये बेड  क्षमता - 450 

  •   शिल्लक   बेड -  00

  •   कोविड  केअर सेंटर क्षमता - 600

  •   शिल्लक  बेड  -00 

  •   सध्या कोविडचे उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या - 1105

  •  मंगळवेढ्यात सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या - 401 

  • निवडणूक अर्ज दाखल केल्यापासून पंढरपूर कोरोना बळी - 10

  •  मंगळवेढा कोरोना बळी - 05


अशा परिस्थितीत रोज मृतांचे आकडे वाढू लागले असून आता केवळ बेड न मिळाल्याने मृत्यू वाढण्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने निवडणुकीत कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जय्यत तयारी केली असली तरी नागरिकांमध्ये मात्र कोरोनाची मोठी धास्ती बसली आहे. अगदी काही नागरिक तर कोरोनातून वाचलो तर मतदान नंतर देखील करता येईल अशी भीती व्यक्त करीत आहेत.  तर काही नागरिकांनी ही निवडणूक टाळली असती तर इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना पसरायला सुरुवात झाली नसती अशी प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत . नागरिक कोरोनाच्या धास्तीत असताना राजकारण्यांना मात्र मतदान कसे होईल आणि जास्तीत जास्त आपल्या मतदारांचे मतदान कसे करून घ्यायचे याची चिंता आहे .